पालिका नाशिक येथील नोंदणी कार्यालयाला प्रस्ताव पाठविणार; पहिल्या वर्गात २५० विद्यार्थिनी क्षमता

वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणाऱ्या राज्यातील मोठय़ा पालिकांनी दुर्लक्षित केलेले परिचर्या महाविद्यालय नवी मुंबई पालिका लवकरच सुरू करणार आहे. तसा प्रस्ताव नाशिक येथील नोंदणी कार्यालयाला पाठविला जाणार आहे. बेलापूर येथे बांधण्यात आलेल्या प्रथम संर्दभ रुग्णालयातील दोन मजले यासाठी वापरले जाणार असून पहिल्यांदा २५० विद्यार्थी क्षमता ठेवली जाणार आहे. पालिकेच्या या उपक्रमामुळे रुग्णालयांना कमी पडणारा परिचर्या कर्मचारीवर्गदेखील उपलब्ध होणार आहे.

राज्यात एकूण ४९ नर्सिग महाविद्यालये आहेत. अनेक खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी हे पुरक शिक्षण सुरू केलेले आहे. या नर्सिग महाविद्यालयातून वर्षांला हजारो परिचर्या शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. मात्र तरीही अनेक रुग्णालयांत प्रशिक्षित परिचर्याचा तुटवडा आहे. त्यामुळे अनेक खासगी रुग्णालयात अप्रशिक्षित परिचर्या रुग्णावर उपचार करीत असल्याचे दिसून येते. परदेशात भारतातील या प्रशिक्षित परिचयार्र्ना मोठी मागणी असून त्यासाठी मिळणारे वेतनही चांगले आहे.

नवी मुंबई पालिकेने पाचस्तरीय आरोग्य सेवा विकसित केली आहे. त्यामुळे वाशी येथे पालिकेचे ३०० खाटांचे मध्यवर्ती रुग्णालय आहे तर नेरुळ व ऐरोली येथे प्रत्येकी १०० खाटांची दोन रुग्णालये सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पालिकेच्या मालकीचे ५०० खाटांची रुग्णालये असून छोटी मोठी तीस रुग्णालये कार्यरत आहेत.

मुंबई, ठाणे पुणे पालिकांनी स्वत:चे वैद्यकीय रुग्णालय सुरू करण्यास पुढाकार घेतला आहे तर नवी मुंबई पालिकेने शहरातील मध्यवर्ती रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयांना शिक्षणासाठी संलग्नता उपलब्ध करून दिलेली आहे.

वाढत्या रुग्णालयीने सेवेमुळे परिचर्या प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा नवी मुंबई पालिकेने प्रस्ताव तयार केला असून या महाविद्यालयाच्या लागणाऱ्या परवानगीसाठी नाशिक येथे वैद्यकीय तर नोंदणी कार्यालयाला पाठविण्यात आलेला आहे. या नोंदणीची मुदत संपलेले आहे पण नगरविकास विभागाकडून त्यासाठी विशेष शिफारस सादर करून ही नोंदणी करणे शक्य होणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

पालिका रुग्णालयात सामावून घेणार

परिचर्या पदविकेसाठी कमीत कमी बारावी सायन्स शिक्षण असून ४५ टक्के ही मर्यादा आहे. चार वर्षांच्या या शिक्षणानंतर बी. एस्सी. नर्सिगची पदविका विद्यार्थीनींच्या हातात पडणार आहे. पालिकेच्या महाविद्यालयात शिक्षण पूर्ण करणाऱ्या परिचर्याना आवश्यकता असल्यास पालिका रुग्णालयात सामावून घेतले जाणार असून इतर परिचर्याना देशातील रुग्णालयात नोकरीसाठी मागणीनुसार शिफारस केली जाणार आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्रात अनेक वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यातील अनेक महाविद्यालयांनी पालिकेच्या रुग्णालये सेवेचा लाभ उठविला आहे. चांगले प्राध्यापक उपलब्ध झाल्यास नवी मुंबई पालिका लवकरच राज्यातील पहिले परिचर्या महाविद्यालय सुरू करण्यास प्राधान्य देणार आहे. तसा प्रस्ताव नाशिक येथे पाठविण्यात आलेला आहे.

– महावीर पेंढारी, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका