प्रजनन प्रक्रियेत आतापर्यंत हजार अंडय़ांची निर्मिती

पूनम धनावडे, नवी मुंबई</strong>

ऐरोली येथील सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्रात मत्स्यशेती सुरू करण्यात आली आहे. येथे विविध प्रकारचे नवीन रंगीत मासे आणण्यात आले आहेत. या प्रकल्पात माशांवर प्रजनन प्रक्रिया करून नवीन माशांची निर्मिती केली जात आहे.

या मत्स्यशेतीतून महाराष्ट्रात त्याचबरोबर  स्थानिक भूमिगत नागरिकांना उद्योग, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. मँग्रोव्हज फाऊंडेशनच्या माध्यमातून शासननिधी अंतर्गत या ‘ओरनामेंटल फिशर युनिट’ सुरू केले आहे. या केंद्रात सध्या ५७ जोडी रंगीत मासे आणले आहेत. हे रंगीत मासे  नॅशनल ब्युरो ऑफ फिश जेनेटिक रिसोर्सेस चेन्नई येथून आणले असून त्यांच्यावर प्रजनन प्रक्रिया करून नवीन मासे निर्मिती केली जात आहे.

यातून निर्माण केलेले मासे स्थापन केलेल्या समित्यांना देत मत्स्यपालन करण्यात येणार आहे. त्यांनतर हे मासे तयार झाल्यानंतर समित्यांनी त्याची बाजारात विक्री करावयाची किंवा पुन्हा केंद्रात पाठविण्याचे नियोजन आहे. या मत्स्यव्यवसायातून मिळणाऱ्या विक्री उत्पन्नातून ७५ टक्के समित्यांनी तर २५ टक्के वाटा महसूल संस्थेला देण्याचे प्रस्तावित आहे.

तीन महिन्यात माशांची पूर्णत: वाढ

या केंद्रात जवळजवळ ६० मोठे फिश टँक ठेवण्यात आले आहेत. यामध्ये सध्या स्थितीला रंगीत माशांच्या ५७ जोडय़ा आणण्यात आल्या आहेत. यासाठी टँकमध्ये समुद्राचे व खाडीचे पाणी आणून त्यावर मत्स्यपालन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एका टँकमध्ये स्त्री व पुरुषलिंगी दोन मासे ठेवण्यात आले आहेत. माशांना कोणत्या स्वरूपाचे पोषक वातावरण लागले, त्यांना लागणारे खानपान उपलब्ध करून दिले जात आहे. आत्तापर्यंत या माशांनी १००० अंडय़ाची निर्मिती केली आहे, अशी माहिती मँग्रोव्हज फाऊंडेशनच्या मुख्य अधिकाऱ्यांनी दिली. अंडय़ांची निर्मिती झाल्यानंतर एक  महिन्याच्या कालावधीत छोटे मासे तयार होतात. हे एक महिन्याचे मासे दोन महिने मत्स्य पालन करण्यासाठी प्रस्तावित समित्यांना दिले जाणार आहेत. त्यांनतर तीन महिन्याच्या कालावधीत माशांची पूर्णत: वाढ झाल्यानंतर त्यांची बाजारात विक्री करता येणार आहे. सध्या बाजारात या रंगीत माशांना अधिक मागणी आहे.