लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल : अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत असताना पालिका अतिक्रमण पथकाची कारवाई होत असल्याने आदई येथील मासळी विक्रेते संतप्त झाले आहेत. शुक्रवारी त्यांनी थेट पालिकेत धडक देत या कारवाईचा निषेध केला. व्यवसायासाठी हक्काची जागा देण्याची मागणी केली. शिवसेनेच्या नवीन पनवेलच्या महिला शहर संघटक अपूर्वा प्रभू यांनी या मासळी विक्रेत्यांच्या समस्या पालिका प्रशासनासमोर मांडल्या.

आदई सर्कल येथे अनेक वर्षांपासून १० ते १२ मासळी विक्रेते व्यवसाय करत आहेत. पालिका स्थापन झाल्यापासून या महिलांवर अतिक्रमण नियंत्रण पथक कारवाई करीत आहे. या महिलांनी पालिकेकडे व्यवसाय करण्यासाठी हक्काची जागा मागितली आहे. मात्र अद्याप सिडको आणि पालिकेचा हस्तांतरणाचा तिढा न सुटल्याने हा प्रश्नही सुटलेला नाही. तरीही कारवाई होत असल्याने या विक्रेत्यांनी महापालिका मुख्यालय गाठत आपला रोष व्यक्त केला.

उपायुक्त विठ्ठल ढाके यांची भेट घेतली. मागील तीन दिवसांपासून मासळी विक्रेत्या महिलांवर कारवाई होत असल्याने त्यांना पालिकेच्या प्रवेशद्वारावर बसावे लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच या मासळी विक्रेत्या केंद्र सरकारच्या पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या दहा हजार रुपये कर्जाच्या लाभार्थी असल्याचे ध्यानात आणून दिले. त्यांना व्यवसायासाठी हक्काची जागा दिल्यास पालिकेचा महसूल वाढेल तसेच बेकायदा पथविक्रेते कमी होतील अशी मागणी या वेळी करण्यात आली.