उरण तालुक्यात खाडी किनाऱ्यांवर खाजगी बंदरांच्या उभारणीसाठी सुरू असलेले मातीचे भराव, त्याचप्रमाणे समुद्रात मिसळणारी रसायने व तेलामुळे वाढते प्रदूषण व वेगाने नष्ट होणारी खारफुटी यामुळे खाडीमुखातील ताजी मासळी गायब होऊ लागली आहे. त्यामुळे या मासळीवर अवलंबून असलेल्या हजारो पारंपरिक मच्छीमार व मच्छीविक्रेत्यांच्या कुटुंबांवर बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहे. खास करून खाडीतील मच्छी विक्रीकरून कुटुंबाचा निर्वाह करणाऱ्या विधवा मच्छीमार महिलांसमोर संसार चालविण्यासाठी काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कुटुंबांचे येथील प्रकल्पात पुनर्वसन करण्याची मागणी ऐरणीवर आली आहे.
उरणमधील खाडी किनाऱ्यावरील गावात भातशेती आणि मच्छीमारीचा जोडव्यवसाय करणारी अनेक गावे आहेत. अरबी समुद्रालगत असलेल्या या गावांच्या सभोवताली समुद्रातून येणाऱ्या पाण्यामुळे छोटय़ा छोटय़ा खाडय़ा तयार झालेल्या आहेत. मासळीच्या प्रजननासाठी निसर्गनिर्मित खारफुटी या खाडी किनाऱ्यावर असते त्यामुळे समुद्रातील मासळीची निर्मिती समुद्रातील आलेली बीजे खाडी किनाऱ्यावरील खारफुटीत येऊन विसावतात व येथेच मासळीची निर्मिती होते. यातील मासळीची पिल्ले ओहटीच्या वेळी समुद्रात जातात व त्यानंतर ती मोठी होतात. याच प्रजनन प्रक्रियेत शिल्लक राहिलेली व भरतीच्या वेळी समुद्रातून येणारी मासळी खाडीतच असते. या ताज्या मासळीची दररोज मासेमारी करून पारंपरिक मच्छीमार आपल्या कुटुंबांचे निर्वाह करीत आहेत. मात्र उरणमधील जेएनपीटी बंदरात उभारल्या जाणाऱ्या पाणजे येथील चौथ्या बंदराच्या परिणामी पाणजे येथील खाडीचे मुखच बंद झाले असून त्यामुळे मासळीच मिळत नसल्याने आम्ही कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न पाणजे येथील मासे विक्रेती महिला करुणा पाटील हिने केला आहे. पतीच्या निधनानंतर खाडीतील मासळीची गावोगावी व उरण शहरात जाऊन विक्री करून कुटुंब चालवीत होते. मात्र आता काय करायचं असा प्रश्न उभा राहिल्याचेही तिचे म्हणणे आहे. सध्या खोल समुद्रातील मासळीवरही लहानातील लहान मासळी पकडणारी जाळी असलेल्या बोटींना परवानगी दिल्याने मासळीच संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे मत करंजा येथील पारंपरिक मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष सिताराम नाखवा यांनी व्यक्त केले आहे. बंदरातील तेलवाहक जहाज, तसेच कंटेनरमधील रसायने समुद्रात मिसळत असल्याने किनारे प्रदूषित झाले आहेत. याचा परिणाम खाडीतील मासळी मरण्याच्या घटनांतून उघड झाली आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी वन विभागाच्या कायद्यांचा भंग करून खारफुटीवरच मातीचा भराव करून मासळीची निर्मिती क्षेत्रेच नष्ट केली जात आहेत. त्यामुळे एकीकडे शेती आणि आता मासळीचा व्यवसाय गमवावा लागत असल्याने हजारो कुटुंबांचे भवितव्यच अंधकारमय झाल्याची प्रतिक्रिया मच्छीमार आकाश भोईर यांनी व्यक्त केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 10, 2016 2:18 am