करंजा टर्मिनल लॉजिस्टिक या खाजगी बंदराचे काम बाधित मच्छीमार आणि मासेमारीशी संबंधित व्यावसायिकांनी काम मंगळवारी बंद पाडले. वारंवार मागण्या करूनही त्या मान्य न करण्यात आल्याने संतप्त मच्छीमारांनी कंपनीचे प्रवेशद्वार रोखून धरले.
करंजा खाडी येथे खासगी बंदराची उभारणी होत आहे. या बंदराच्या उभारणीमुळे करंजामधील मासेमारीवर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांच्या व्यवसायावर परिणाम होणार आहे. त्यामुळे मच्छीमारी व्यवसाय करणारे व व्यवसायावर अवलंबून असलेल्यांचा सव्‍‌र्हे करून नुकसानभरपाई, बंदरातील विकासकामांमध्ये रोजगाराची मागणी ‘करंजा मच्छी, भाजी फुले, चिकन, मटण विक्रेता सामाजिक संस्थे’ने केली होती. या मागण्यांसाठी वारंवार आंदोलनेही केली. त्यानंतर शासनाने मच्छीमारांचे सव्‍‌र्हेक्षण करून बाधीत मच्छीमारांच्या याद्या तयार केल्या आहेत; मात्र त्यांना आजवर नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही, उलट बंदराचे काम जोमाने सुरू ठेवून भलत्याच लोकांना याचा फायदा दिला जात असल्याचा आक्षेप आंदोलनाच्या नेत्या वंदना कोळी यांनी केला. या संदर्भात बंदराचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतरही भरपाई दिली जात नसल्याचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सीताराम नाखवा यांनी सांगितले. या वेळी चाणजे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रदीप नाखवा हेही या आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.