राज्याच्या किनारपट्टीवर सध्या आर्थिक संकटाचे ढग दाटून आले आहेत. अरबी समुद्रात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मासेमारीतील नैसर्गिक अडथळे ऑक्टोबपर्यंत कायम राहिल्याने मच्छीमारांच्या हातातोंडचा घास हिरावला गेला आहे. ‘कयार’ वादळ सरून गेल्यानंतर आता पुन्हा चक्रीवादळाचा इशारा देण्यात आल्याने मच्छीमारांची अर्थनौका वादळात सापडली आहे.

१५ दिवसांपासून समुद्रातील मासेमारी बंद राहिल्याने मासेमारी जवळपास ठप्प झाली आहे. त्यामुळे पालघर, वसईसह उरण आणि आजूबाजूच्या किनारपट्टी गावांतील मासळीत कमालीची घट झाली आहे. याचा मोठा फटका दरांवर होऊ लागला आहे. मासळी खाणे खवय्यांनाही परवडेनाशी झाली आहे. ही स्थिती आणखी काही दिवस अशीच कायम राहिल्यास मच्छीमारांना गुजराण करण्यापुरतीही कमाई करणे शक्य होणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालघर वसई आणि            उरण पट्टय़ातील मच्छीमारांना शासनाकडून मिळणारे गेल्या काही महिन्यांपासूनचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. यंदा पावसाळ्यातील दोन महिन्यांच्या मासेमारीवरील बंदीनंतर मासेमारांना चांगले दिवस येतील, अशी आशा होती. मात्र पावसाळा लांबला तसेच वादळी वाऱ्यांचा प्रभावही वाढल्याने मासेमारीवर परिणाम झाले असल्याची माहिती मच्छीमार नेते सीताराम नाखवा यांनी दिली.

चक्रीवादळाचे सावट असल्याने मासेमारी बोटी किनाऱ्यावर नांगरण्यात आल्या आहेत. परिणामी मासळीची आवकही घटली आहे.त्यात ग्राहकांनाही महागडी मासळीकडे पाठ फिरवली आहे.

ताजी मासळीही दुरापास्त

* बाजारात एरवी येणाऱ्या माशांपेक्षा कमी माशांची आवक असल्याने मागणी जास्त मात्र मासे कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. समुद्राच्या मासळी बरोबरीने खाडीतील मिळणारे मासेही कमी झाली आहे. हॉटेल व्यावसायिकांना पापलेट, सुरमईचा पुरवठा होत नसल्याने शीतगृहात साठवलेल्या माशांवर अवलंबून राहावे लागते.

* अर्नाळा नायगाव, वसई, वडराई, केळवे, नवापूर, उच्छेळी-दांडी, डहाणू आदी ठिकाणी मासेमारीत बोंबील, कोळंबी आदी ताज्या मासळीचा पुरवठा केला जातो, तर वसई, नायगाव, अर्नाळा, सातपाटी, मुरबे, डहाणू आदी बंदरातून पापलेट, घोळ, दाढा, सुरमई आणि हलवा आदी माश्यांच्या मोठा पुरवठा होत असतो. मात्र समुद्रात मासेमारीला गेलेल्या सर्व बोटी बंदरात आल्या होत्या. वादळाचा इशारा व मासेमारीसाठी न जाण्याच्या सूचनाही मिळाल्याने मासेमारी बंद झाली.

* भातशेतीचे झालेले नुकसान लक्षात घेता आदिवासी बांधव, खलाशी, कामगार मासेमारी नौकेवर येण्यास तयार नाहीत. खेपेमागे कामगारांना दिला जाणारा महिना पगार, डिझेल व बर्फ आदी सामग्री आदी सुमारे दीड लाखाचा खर्चही भरून काढणे शक्य नाही,अशी भीती मच्छिमार राजन मेहेर यांनी व्यक्त केली.

सर्वच मासळींचे दर दुप्पट

सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या बोंबीलचा भाव दुपटीने वाढला आहे. पूर्वी ५०रुपयांना मिळणारे पाच बोंबील आता १०० रुपयाने विक्री केली जात आहे. तीन  मध्यम पापलेट आधी ३०० रुपयांना मिळायचे. ते आता ५०० ते ६०० रुपयांना मिळत आहे. ५० रुपये वाटय़ावर मिळणाऱ्या कोलंबीचा भाव आता ८० ते १००रुपये वाटा आहे.