28 September 2020

News Flash

मत्स्यटंचाईमुळे मच्छिमारांच्या होळीचा ‘बेरंग’

या वर्षी पडलेल्या मत्स्यदुष्काळामुळे त्यांच्या होळीचा ‘बेरंग’ झाल्याचे दिसून आले.

(संग्रहित छायाचित्र)

बोटीवर लावण्यासाठी मोठा मासाही मिळेना!

समुद्राच्या खवळलेल्या लाटांचा सामना करीत आपला मासेमारी व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांकडून समुद्राच्या उसळत्या लाटांचा सामना करीत कुटुंबीयांसह उत्साहात होळी साजरी करण्यात येते. मात्र या वर्षी पडलेल्या मत्स्यदुष्काळामुळे त्यांच्या होळीचा ‘बेरंग’ झाल्याचे दिसून आले. बोटीवर लावण्यासाठीही मोठा मासा मिळाला नसल्याची खंत मच्छिमारांनी व्यक्त केली.

वर्षांतून एकदाच कुटुंब मच्छीमार बोटीवर येतात आणि होळीचा उत्सव साजरा करतात. या वेळी बोटीच्या समोरच्या (नालीजवळ) भागात मच्छीमार पूजा करून सर्वात मोठा मासा बांधतो. तसेच इतर बोटींशी स्पर्धा करीत कच्चीबच्ची व महिला उत्साहात होळी साजरी करतात.

या सणासाठी मासेमारीसाठी खोल समुद्रात गेलेल्या सर्व बोटी घरी परततात. या वेळी होळीसाठी बोटी सजविल्या जातात. बोटीला रंगीबेरंगी चमकती पताके, नवीन साडय़ा तसेच मोठमोठय़ा फुलांच्या हाराने सजविण्यात येते. बोटीवरच संपूर्ण साहित्य ठेवून महिलांच्या हस्ते पूजा केली जाते. या वेळी मासेमारी करीत असताना पकडलेल्या मोठय़ा माशाची विविधत पूजा करून बोटीच्या समोरच्या भागात लावण्यात येतो. त्यानंतर रंगाची उधळण करीत कुटुंबाची होळी सुरू होते. नाचगाण्याच्या ठेक्यावर भर समुद्रात होळी साजरी करण्याचा आनंद घेतला जातो. परंपरा म्हणून समुद्रात ही होळी साजरी केली जात असल्याची माहिती श्रीकांत कोळी यांनी दिली.

मच्छीमारीसाठी एक बोट गेल्यानंतर १० ते ११ टन मासळी मिळत होती. यामध्ये नळ, कोळंबी, छोटी मासळी तसेच मोठी मासळी यांचा समावेश होता. ती संख्या सध्या २ ते ३ टनावर आली आहे. त्यामुळे व्यवसायाकरिता केलेल्या कष्टाचे फळही मिळत नसल्याची खंत विनायक पाटील या मच्छीमाराने व्यक्त केली.

पाच किलोचाही मासा सापडेना

होळी साजरी करण्यासाठी आमच्या बोटीला १५ ते ३० किलोपेक्षा अधिक वजनाचे मासे लावले जात असत. मात्र यावर्षी मासळीच्या टंचाईमुळे पाच ते सहा किलोचे मासे लावण्याची वेळ आमच्यावर आली असल्याचे मच्छीमार समीर नाखवा यांनी सांगितले.

वर्षभर समुद्रामुळेच आमच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही परंपरेची होळी आम्ही साजरी करीत असतो. जो मासा पूजा करून बोटीसमोर लावलेला असतो तो सायंकाळी होळीनंतर कापून त्याचे वाटे करून ते नातेवाईत, शेजारी तसेच ओळखीच्या लोकांना प्रसाद म्हणून देण्याची प्रथा आहे.

– विनया नाखवा, मच्छीमार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 12:54 am

Web Title: fishermen holi colorless due to fish scarcity
Next Stories
1 नवी मुंबईतून १५ टनप्लास्टिक जप्त
2 वाशी खाडीवरील तिसऱ्या पुलाची रखडपट्टी
3 परीक्षा संपत आल्यावर पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश
Just Now!
X