करंजा, मोरा येथील ३०० बोटी किनाऱ्यावर; मासे महाग

सरकारने एलईडी मासेमारीवर बंदी आणावी व समुद्रातील मासळी वाचवावी या मागणीसाठी करंजा व मोरा या दोन बंदरांतील ३०० पेक्षा अधिक मासेमारी बोटी गेल्या महिनाभरापासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या बोटींवर अवलंबून असलेल्या १० हजारांपेक्षा अधिकच्या व्यक्तींवर उपासमारीची वेळ आली आहे. मच्छीमार आयुक्त, शासन, लोकप्रतिनिधी यांना वारंवार साकडे घालूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे. बोटी बंद असल्यामुळे दैनंदिन मासेमारीत घट होऊन मासळी महाग झाली आहे.

करंजा तसेच किनार पट्टीवरील मच्छीमार व खलाशी जानेवारी २०१८ पासून बेकायदा एलईडी मासेमारीवर बंदी आणण्याची मागणी करत आहेत. त्यासाठी राज्याच्या मत्स्यव्यवसाय आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्यात आले होते. एक दिवस ससून डॉकही बंद ठेवण्यात आला होता. तेव्हापासून उरणच्या करंजा परिसरातील ट्रॉलरने मासेमारी करणाऱ्या बोटींनी मासेमारी बंद ठेवली आहे. मासेमारी आणि विक्री करणाऱ्यांची साखळी आहे. बंदीचा परिणाम बाजारातही जाणवू लागला आहे. मासळीची आवक घटल्याने मासळीचे दर वाढू लागले आहेत.

मासेमारी ही माशांच्या उत्पत्तीवर अवलंबून असलेला व्यवसाय आहे. त्यामुळे समुद्रात माशांचे प्रजोत्पादन व वाढ होऊ देणे गरजेचे आहे, मात्र एलईडी मासेमारीमुळे यात अडथळे येत आहेत. मासे नष्ट होण्याची आणि त्यामुळे या व्यवसायावरच गंडांतर येण्याची शक्यता आहे. एलईडी मासेमारीकडे शासन दुर्लक्ष करत आहे.

मरतड नाखवा, वैष्णवी मच्छीमार सोसायटी, करंजा