मच्छीमारांची लगबग सुरू; १५ दिवसांपेक्षा अधिक काळ असल्याने फायदा

पावसाळा सुरू झाल्यानंतर १ जूनपासून बंद करण्यात आलेली मासेमारी १ ऑगस्टपासून सुरू होणार असून यासाठी मच्छीमारांची लगबग सुरू झाली आहे. मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली उरणमधील मोरा व करंजा या बंदरात नव्या हंगामाची कामे सुरू झाली आहेत. मोरा बंदर किनाऱ्यावर शाकारण्यात आलेल्या मच्छीमार बोटींवरील कामांनाही सुरुवात झाली आहे.

समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना केंद्र व राज्य सरकारकडून मासळीच्या प्रजननाचा कालावधी म्हणून दोन महिन्यांची बंदी घालण्यात येते. या कालावधीत दरवर्षी मासळीचा दुष्काळ जाणवतो. त्यामुळे खवय्यांना खाडीकिनाऱ्यावरील मासळी तसेच सुकी मासळी यावर अवलंबून राहावे लागते. तसेच या बंदीमुळे व्यवसायावर अवलंबून असलेल्या मच्छीमार बोटींचे मालक (नाखवा) व बोटींवरील खलाशी यांनी आर्थिक अडचणीत काम करावे लागते. यापूर्वी दोन महिन्यांचा कालावधी हा नारळीपौर्णिमेपर्यंत असायचा, कारण तोपर्यंत पावसामुळे खवळणारा समुद्र शांत होतो. त्यामुळे खोल समुद्रातील मासेमारीतील धोका कमी होतो, मात्र मागील अनेक वर्षांपासून सरकारच्या अटी-नियमांमुळे, तसेच समुद्रकिनाऱ्यावरील व आतील वाढत्या प्रदूषणाचा परिणाम होत असल्याने मासळीच्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे मासेमारीवरील बंदी १ ऑगस्टलाच उठत असल्याची माहिती मोरा येथील मच्छीमार चिंतामण कोळी यांनी दिली आहे. सोमवारपासूनच मासेमारीला सुरुवात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले, तर सध्या अनेक खलाशी हे शेतीच्या कामात असल्याने काही बोटी या नारळीपौर्णिमेच्याच वेळी बाहेर काढल्या जातील, अशी माहिती करंजा येथील मच्छीमार अंकुश नाखवा यांनी दिली.

सध्या पंधरा दिवसांपेक्षा अधिक दिवस असल्याने आमच्या जाळ्यांचे तसेच बोटींचे इंजिन तसेच इतर कामेही सुरू आहेत. त्यासाठी मोरा किनाऱ्यावर नांगरलेल्या बोटी मोरा जेट्टीच्या परिसरात आणून काम सुरू करण्यात आल्याची माहिती करंजा येथील मच्छीमार आकाश भोईर यांनी दिली. राज्य सरकारने पर्सिसीन जाळ्यांच्या साहाय्याने मासेमारी करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याने यंदा मच्छीमारांना अधिक फायदा होईल अशी माहिती सीताराम नाखवा यांनी दिली.