News Flash

शाळेच्या परिसरात पाच बार

नावडे येथील प. जो. म्हात्रे या विद्यालयासमोरही काही प्रमाणात बार सुरू आहेत.

संग्रहित छायाचित्र

पनवेलच्या कोन गावातील स्थिती; गटशिक्षण अधिकारी मात्र अनभिज्ञ

शाळा व महाविद्यालयांपासून १०० मीटपर्यंतच्या परिघात तंबाखूजन्य पदार्थ आणि मद्याची विक्री करणारी दुकाने, बार असू नयेत, असा नियम आहे, मात्र पनवेलच्या कोन गावात हा नियम धाब्यावर बसवण्यात आला आहे. येथील सेंट झेवियर्स शाळेच्या परिसरात एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच बार सुरू आहेत. अलिबागचे गटशिक्षण अधिकारी मात्र याविषयी अनभिज्ञ आहेत.

कोन गावातील सेंट झेवियर्स या इंग्रजी माध्यमाच्या शाळेपासून काही अंतरावर कोयल, नाइट रायडर, साईदर्शन, गोल्डन नाइट, टाइम्स हे बार सुरू आहेत. याचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे, असे पालक आणि परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे. शाळेत ये-जा करतानाच्या दृश्यांविषयी लहान मुले विचारतात, तेव्हा त्यांना काय सांगावे, असा प्रश्न पडतो, असे पालकांचे म्हणणे आहे. जिथे संस्कार होतात त्या परिसरातच मद्यविक्री होत असल्यामुळे किशोरवयीन मुलांना व्यसने जडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. महिलांचीही छेडछाड होत आहे. त्यामुळे हे बार बंद करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

शाळा, बारमधील अंतर

* शाळेच्या प्रवेशद्वाराच्या समोर ३० मीटरवर ‘टाइम्स’ बार आहे.

* शाळेच्या डाव्या बाजूला २० मीटरवर ‘गोल्डन नाइट’ व ‘साईदर्शन’ आणि पुढे ‘नाइट रायडर्स’ हे बार आहेत.

* शाळेच्या पूर्वेला डावीकडे ५० मीटरच्या अंतरावर ‘कोयल’ बार आहे.

नावडे, कळंबोलीतही हीच स्थिती

नावडे येथील प. जो. म्हात्रे या विद्यालयासमोरही काही प्रमाणात बार सुरू आहेत. ‘कमल पंजाब’, ‘न्यू-महाराष्ट्र’, ‘चंद्रविलास’ हे बार अनधिकृत आहेत. त्याचप्रमाणे कळंबोली गावातदेखील हीच परिस्थिती आहे. हे बार बंद करण्यात यावेत, यासाठी वारंवार आंदोलने करण्यात आली आहेत. निवेदने देऊनही परिस्थिती जैसे थे आहे.

शाळेच्या परिसरातील बारसंदर्भात आमच्याकडे अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. आम्हाला याविषयी माहिती नाही, मात्र परिसरात बार सुरू असतील, तर सखोल चौकशी केली जाईल. आधी शाळा सुरू झाली की बार, हे तपासून पाहावे लागेल. ही सर्व माहिती मिळवून नंतर कारवाई केली जाईल.

– शेषराव बडे, गटशिक्षण अधिकारी, अलिबाग 


महामार्गालगतच्या बारवर भरारी पथकांची नजर
‘उत्पादनशुल्क’ची तालुकानिहाय ६ पथके

नवी मुंबई : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतरावर असणारे बार बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिलपासून या परिसरातील सर्व बार बंद करण्यात आले आहेत, मात्र छुप्या पद्धतीने मद्य किंवा बनावट दारू विकणाऱ्या, मद्यसाठा करणाऱ्या बार मालकांवर कारवाई करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथके स्थापन केली आहेत. असे प्रकार आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक प्रकाश दाते यांनी दिला आहे. तालुका निहाय ६ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. पनवेलसह उरण, कर्जत, पेण, सुधागड परिसरात करडी नजर ठेवण्यात येणार आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सर्व बिअरबार, परमिट रूम, मद्यविक्रीची दुकाने व हॉटेलमध्ये मद्यविक्री करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. पनवेल परिसरातील ३७० पैकी १५० बार सुरू आहेत.

उर्वारित २२० बार बंद करण्यात आले आहेत. महामार्गापासून ५०० मीटर बाहेर गेल्यास परवान्यांचे नूतनिकरण केले जाईल, असे राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक प्रकाश दाते यांनी सांगितले आहे.

हॉटेलामंध्ये खाद्यपदार्थाची विक्री मात्र सुरूच राहणार आहे. मनोरंजनाचे कार्यक्रमही बंद ठेवण्यात आले आहेत. मद्यविक्री करणाऱ्या अनेक हॉटेलांची कमाई प्रामुख्याने मद्यावरच अवलंबून होती. त्यामुळे छुप्या पद्धतीने मद्यविक्री केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाढीव भरारी पथकेही तयार केली आहेत. पनवेल परिसरातील महामार्गावर मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गासह महामार्ग क्रमांक ४वर ही मद्यविक्री दुकाने आणि बार आहेत. पनवेलमध्ये एकूण १२० परमिट रूम आणि ७४ बिअर शॉप आहेत. त्यापैकी २८ हे लेडीज सव्‍‌र्हिस बार आहेत. पनवेल विभागाला वर्षांकठी १ कोटी २० लाखांचा महसूल यातून मिळतो.

सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या निर्णयानुसार आम्ही कारवाई करतो. अवैध मद्यविक्री केल्यास मुंबई दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम ६५ इ नुसार अजामिनपात्र गुन्हा नोंदवण्यात येईल. तीनवर्षे शिक्षा किंवा २५,००० रुपये दंड भरावा लागेल. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी अतिरिक्त भरारी पथके तयार करण्यात आली आहे. महामार्गालगतची मद्यविक्री थांबवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सज्ज आहे.

– प्रकाश दाते, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2017 3:43 am

Web Title: five beer bar in school premises in panvel
Next Stories
1 राजकारणी, अधिकारी साटेलोटे पुन्हा सुरू
2 २०१५ नंतरच्या बांधकामांवर टांगती तलवार
3 वाशी बाजारात आगीसाठी ‘मसाला’
Just Now!
X