X

रबाळेतून बेपत्ता झालेली पाच मुले मुंबईत सापडली

रबाळे येथील कातकरी पाडा हा भाग आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील पाच मुले बुधवारी दुपारपासून बेपत्ता होती.

नवी मुंबईतील रबाळे येथून बेपत्ता झालेली पाचही मुले अखेर मुंबईत सापडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटीएम) येथे ही मुले सापडले असून टीसीने या मुलांना पकडल्याने हा प्रकार समोर आला.

रबाळे येथील कातकरी पाडा हा भाग आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील पाच मुले बुधवारी दुपारपासून बेपत्ता होती. पाचही मुले वेगवेगळ्या वयोगटातील असून ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. यात दोन भावंडांचाही समावेश आहे. इयत्ता दुसरी ते सहावीपर्यंत शिकणारी ही मुले आहेत. यातील एका मुलाचे वय ८, तीन मुलांचे वय ११ आणि एका मुलाचे वय १३ वर्ष आहे. पाचही जण बुधवारी दुपारी शाळा सुटल्यावर एकच्या सुमारास याच परिसरातील मैदानात खेळत असल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली. मात्र, त्यानंतरही पाचही जण बेपत्ता झाले. मुले एकत्रित कुठे गेली की वेगवेगळे, याबाबत ठोस माहिती मिळू शकलेली नव्हती. सर्वच मुले अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली.

अखेर गुरुवारी दुपारी ही मुले सीएसटीएम स्थानकात सापडली. टीसीने या मुलांकडे तिकीटांची विचारणा केली आणि हा प्रकार उघड झाला.

First Published on: September 6, 2018 2:59 pm