रबाळे पोलीस ठाण्याच्या ५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एकाच कंपनीत काम करणारे महिला आणि पुरूष सहकारी गाडीतून घरी जात असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली.

सदर पोलिसांनी त्यांच्यावर अश्लिल प्रकार करत असल्याचा आरोप केला. तसेच कारवाई होऊ द्यायची नसेल तर २ लाख रुपयांची मागणी केली. मात्र, एवढे पैसे नसल्याचे त्यांनी सांगितल्यावर सदर महिलेस एटीएममधून ४६ हजार काढण्यास पोलिसांनी भाग पाडले. ६ मे रोजी रबाळे येथे हा प्रकार घडला.

याबाबत सदर महिलेने थेट रबाळे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार केली. त्यानंतर सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची ओळख परेड घेण्यात आली. दरम्यान, ज्यांनी त्यांच्याकडून पैसे घेतले अशा पाच जणांची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर या घटनेबाबतचा अहवाल पाठवण्यात आला. अहवालानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

स्वप्नील काशीद, सागर ठाकूर, श्रीकांत गोकनुर, वैभव कुऱ्हाडे आणि नितीन बराडे अशी निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्यावर लाच मागणे, लाचेचा स्वीकार करणे, नैतिक अध:पतन आदी कलमान्वये कारवाई करण्यात आल्याची माहिती उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली.