नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस दलातील १५८७ कर्मचारी, अधिकारी व नातेवाईक आतापर्यंत करोनाबाधित झाले असून यापैकी १५२२ जण करोनामुक्त झाले आहेत. हे चित्र सकारात्मक असले तरी पोलिसांना पुन्हा करोनाचा संसर्ग होत आहे. आतापर्यंत पाच पोलिसांना पुन्हा संसर्ग झाला आहे, ही चिंतेची बाब आहे.

टाळेबंदीत पोलीस कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम केले. त्यामुळे करोनाचा संसर्ग पोलीस दलात मोठय़ा प्रमाणात पसरला होता. नवी मुंबई पोलिसांतही करोनाचे रुग्ण वाढत होते. आतापर्यंत १२५ पोलीस अधिकारी, ८४४ कर्मचारी व ५५४ त्यांचे कुटुंबीय यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यातील १७ जणांचा मृत्यू झाला. यात १० पोलीस कर्मचारी असून ७ जण कुटुंबीय आहेत. नवी मुंबईत करोनाकाळात पोलिसांसाठी वेलनेस पथक निर्माण केल्याने वेळीच उपचार व आधार मिळाल्याने मृत्यूचे प्रमाण कमी असून करोनामुक्त होण्याचे प्रमाणही अधिक आहे. १५८७ करोनाबाधितांपैकी १५२२ जण करोनामुक्त झाले आहेत. यातील ९५ टक्के कर्मचारी कर्तव्यावर परतले आहेत. हे सर्व सकारात्मक चित्र असताना आता करोनाचा पुन्हा संसर्ग होत असल्याचे चित्र आहे. नवी मुंबई पोलीस दलातील करोनाबाधितांपैकी पाच जणांना परत करोना संसर्ग झाला आहे. यात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश होता. यातील एक जण परत करोनामुक्त झाले आहेत. अन्य उपचार घेत आहेत.