विकास महाडिक

पावसाळ्यात जलमय झालेल्या गावांनी पुनर्वसनाशिवाय स्थलांतर नाही, असा पवित्रा घेतला आहे. नवी मुंबई विमानतळासाठी सिडकोला दहा गावांची जमीन आवश्यक होती. त्यामुळे त्यांना सर्वोत्तम मोबदला देऊन स्थलांतर करण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे. त्यातील सहा गावांनी जास्तीत जास्त स्थलांतर केले आहे, पण गणेशोत्सवात पाण्याखाली गेलेल्या गावांनी योग्य मोबदला दिल्याशिवाय स्थलांतर करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

यात पारगाव, ओवळा, डुंगी, दापोली आणि भंगारपाडा या गावांमध्ये पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्याने या गावांचेही स्थलांतर करण्यात यावे, यासाठी मागणी जोर धरू लागली आहे.

येत्या डिसेंबपर्यंत या विमानतळावरून पहिले उड्डाण होईल असे सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले होते, मात्र प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर आणि दक्षिण बाजूकडील एक टेकडी आणखी कमी करण्याच्या विमान प्राधिकरणाने टाकलेल्या अटीमुळे हे उड्डाण आता लांबणीवर पडले आहे. राज्य सरकार पुढील वर्षी एप्रिलपर्यंत हे विमानतळ कार्यान्वित होईल असे कितीही जाहीर करीत असले तरी त्याला येणाऱ्या अडथळ्यांमुळे हे उड्डाण आणखी एक वर्ष घेईल, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

नवी मुंबई विमानतळासाठी एकूण २२६८ हेक्टर जमीन आवश्यक असून ११६० जमिनीवर प्रत्यक्षात विमानतळ उभारले जाणार आहे. शिल्लक एक हजार हेक्टर जमीन ही विमान परिचलन आणि भविष्यातील तरतुदींसाठी मोकळी ठेवली जाणार आहे. त्यामुळे सिडकोने विमानतळाच्या कामाला सुरुवात करताना दहा गावांतील ६७१ हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया कागदोपत्री पूर्ण केली आहे, मात्र या परिक्षेत्रात येणाऱ्या चार गावांत दोन पावसाळे पाच ते सहा फूट पाणी साचल्याने येथील ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत.

विमानतळ प्रकल्पातील उलवा कोंबडभुजे, वरचा ओवळा, डुंगी या गावांत पुढील शंभर वर्षांत पावसाचे पाणी साचणार नाही, असा दावा सिडकोने केला होता. तो यंदाच्या पावसाने फोल ठरविला. सिडको या ग्रामस्थांबरोबर अनेक बैठका घेत आहे; पण त्यातून योग्य तो तोडगा निघत नसल्याने कोंबडभुजे आणि उलवा येथील ५० टक्के ग्रामस्थांनी अद्याप स्थलांतर केलेले नाही. या पावसाळ्यात भराव टाकण्यात आलेल्या आजूबाजूच्या गावांची पाण्याने दैना उडवून दिली होती. त्यामुळे पारगाव, डुंगी, ओवळा, भंगारपाडा आणि पारगाव ही पाचही गावे जलमय झाली होती. प्रकल्प पूर्ण होण्याअगोदरच या गावांची ही स्थिती आहे.

दहा गावांबरोबर इतर पाच गावांचेही स्थलांतर करण्यात यावे ही आमची मागणी पहिल्यापासून होती. सिडकोने त्याकडे दुर्लक्ष केले. आमची गावे कशी सुरक्षित आहेत त्याचे सादरीकरण करण्यात आले होते; पण निसर्गाने ते फोल ठरविले आहे.

– महेंद्र पाटील, अध्यक्ष, नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती