नाल्याच्या संरक्षक भिंतीचे काम रखडले; स्थायी समितीमध्ये प्रस्ताव नामंजूर

नवी मुंबई : तुर्भे येथील बोनसारी गावालगत असलेल्या नाल्याच्या संरक्षण भिंतीचा प्रस्ताव मंगळवारी दि.१८ रोजी झालेल्या स्थायी समितीत मांडण्यात आला होता, परंतु  शहरातील सर्व नाल्याचे काम नाला व्हिजनअंतर्गत एकत्रित करण्यात यावा अशी सूचना देत हा प्रस्ताव बहुमताच्या जोरावर स्थायी समितीत नामंजूर करण्यात आला. पुढील कालावधीत आचारसंहिता लागणार असून येणाऱ्या पावसाळ्यातदेखील हे काम रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाही येथील वस्ती पून्हा पाण्याखाली जाणार असल्याचे चिन्ह आहे.

मागील वर्षी पावसाळ्यात तुर्भे एमआयडीसीतील बोनसारी गावालगत असलेल्या नाल्यालगतच्या वस्तीत पावसाळ्यातील पाणी शिरले होते. म्हणून त्या नाल्याभोवती दुतर्फा तात्काळ संरक्षक भिंत बांधण्याचा आदेश माजी आयुक्त व महापौर यांनी दिले होते.    दि. ८ जुलै २०१९ रोजी पडलेल्या जोरदार पावसामुळे तुर्भे एमआयडीसीतील बोनसारी गावातील नाला तुडुंब भरला होता, या ठिकाणी संरक्षक भिंत नसल्याने येथील रहिवाशांच्या घरात पाणी शिरले होते. शहरातील इतर नाल्यांचीदेखील हीच स्थिती होती, त्यामुळे मागील वर्षी पडलेल्या मुसळधार पावसाने शहर जलमय झाले होते. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. रामस्वामी एन. व महापौर जयवंत सुतार यांनी या ठिकाणी पाहणी दौरा केला होता. आयुक्तांनी हा नाला भरण्यास कारणीभूत असलेल्या दगडखाण मालकांवर गुन्हा नोंदविण्याचे व या ठिकाणी तात्काळ सुरक्षा भिंत उभरण्याचे तसेच नाल्याची खोली वाढविण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, या घटनेनंतर दुसरा पावसाळा जवळ आला तरी येथील भिंत उभारण्यात आलेली नाही. नाल्याला संरक्षक भिंत बाधण्याचा ५ कोटी २४ लाख २२ हजार १११ रुपये  खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आला होता. नाला व्हिजनअंतर्गत सर्व नाल्यांचे एकत्रित काम करण्याचे नियोजन असून या नाल्याबाबतचा निर्णयही त्या वेळी करण्यात यावा अशा सूचना सभापती नवीन गवते यांनी दिल्या. त्यामुळे हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला.

या वेळी सभापती यांनी नाला व्हिजनअंर्तगत एकत्रित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या, यावर सदस्य रंगनाथ औटी यांनी कडाडून विरोध करीत नाराजी व्यक्त केली. या वेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांचे नगरसेवक पक्ष सोडत आहेत म्हणून जाणीवपूर्वक हा प्रस्ताव नामंजूर करत असल्याचा आरोप करत सभापती नवीन गवते यांच्या अंगावर कागद भिरकावून निषेध नोंदवला.

आचारसंहितेमुळे नियोजन कोलमडणार

येत्या एप्रिलमध्ये महापालिका निवडणुका होणार असून कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. महापालिका सत्ता स्थापन होण्यासाठी मे महिना उजाडेल आणि शहरातील सर्व नाल्यांचे नाला व्हिजनअंर्तगत एकत्रित प्रस्ताव कधी येणार? जूनमध्ये पावसाळा सुरू होतो. त्यामुळे नाल्यांना संरक्षक भिंती उभारण्याचे काम कधी सुरू होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्थायी समितीच्या सूचनेनुसार नवी मुंबईतील सर्व नाल्यांचे नाला व्हिजनअंतर्गत कामे केली जातील व तसा प्रस्ताव तयार केला जाईल.

– सुरेंद्र पाटील, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका

नवी मुंबई शहरातील नाल्यांची पावसाळी समस्या सर्व ठिकाणी आहे. दिघा परिसरातही मोठय़ा प्रमाणात नागरी वस्तीत पाणी शिरते. त्यामुळे प्रशासनाने नाला व्हिजनअंतर्गत एकत्रित सर्व नाल्यांचा प्रस्ताव तयार करून स्थायी समितीसमोर सादर करावा.

– नवीन गवते, सभापती, स्थायी समिती