गाळ काढण्याची परवानगी नसल्याने नवी मुंबईत पुराची शक्यता

खाडीकिनारी वसलेली नवी मुंबई पुरापासून सुरक्षित रहावी, यासाठी सिडकोने केरळच्या धर्तीवर उघाडी पद्धतीचे धारण तलाव (होल्डिंग पाँड) बांधले, मात्र आता या तलावांमुळेच शहराला पुराचा धोका निर्माण होण्याची भीती सिडको व पालिकेच्या अधिकारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. या तलावांत गेली आठ वर्षे साचलेला गाळ काढण्याची परवानगी सागरी नियंत्रण विभागाने न दिल्याने हा पेच निर्माण झाला आहे.

नवी मुंबईला ६० किलोमीटरचा खाडीकिनारा लाभला आहे. त्यामुळे शहराची निर्मिती करताना भरती-ओहोटीच्या पाण्याचे नियोजन सिडकोच्या वतीने ४० वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. त्यासाठी सर्व नोडच्या पश्चिम बाजूस केरळमधील उघाडी पद्धतीचे तलाव बांधण्यात आले. खाडीकिनारी असलेल्या सात उपनगरांच्या पश्चिम बाजूस असे तलाव असून यात भरतीचे पाणी साचते. त्यामुळे उधाणाच्या भरतीत देखील नवी मुंबईतील शहरी भागांत खाडीचे पाणी साचत नाही. सिडकोच्या वतीने आणि १९९४ नंतर पालिकेच्या वतीने या धारण तलावांची दरवर्षी स्वच्छता केली जात होती, मात्र चार वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या एका अध्यादेशामुळे खारफुटी क्षेत्रापासून ५० मीटर लांब कोणत्याही प्रकारचे काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सिडकोला आपल्या दक्षिण नवी मुंबई क्षेत्रात आणि नवी मुंबई पालिकेला आपल्या क्षेत्रात असलेले हे धारण तलाव स्वच्छ करता आलेले नाहीत. त्यामुळे यंदा कोसळणाऱ्या ९६ टक्के पावसाच्या काळात निर्माण होणाऱ्या पूरसदृश परिस्थितीवर मात कशी करायची, असा प्रश्न पालिकेला पडला आहे. सिडकोने आपल्या क्षेत्रातील हे धारण तलाव स्वच्छ करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी गेली दोन वर्षे केंद्र व राज्य सरकारकडे केली आहे. तत्कालीन सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी हे तलाव स्वच्छ करून न दिल्यास शहराला पुराचा धोका उद्भवू शकतो, असे सागरी व्यवस्थापन विभागाला कळविले आहे.

नवी मुंबई हे शहर खाडीकिनाऱ्यावर वसले आहे. त्यासाठी मोठा भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे भरती रेषा शहराच्या जवळ आली आहे. खारफुटीच्या संरक्षणामुळे शहराला असणारा पुराचा धोका काही प्रमाणात नियंत्रणात आला आहे, पण शहराच्या बाहेर असलेल्या धारण तलावामध्ये मोठय़ा प्रमाणात गाळ साचलेला आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वर येण्याची भीती आहे. त्यामुळे शहरात जास्त पाऊस आणि भरती आल्यास पाणी साचण्याची शक्यता आहे.    – अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका