वसई परिसरातून अत्यल्प आवक झाल्याने दर दुप्पट

नवी मुंबई वसई परिसर जलमय झाल्यामुळे नवी मुंबई आणि परिसरात तिथून येणाऱ्या फुलांचे भाव गगनाला भिडले आहेत. वसईतील स्थिती सुधारल्याशिवाय हे दर स्थिरावण्याची चिन्हे नसल्यामुळे ऐन आषाढात फुले महागलेलीच राहण्याची शक्यता आहे.

आषाढ महिना सणांची चाहूल घेऊन येतो व फुलांची मागणी वाढू लागते. नेमक्या याच काळात आवक घटली आहे, त्यामुळे येता किमान एक ते दीड महिना फुलांचे दर चढेच राहण्याची चिन्हे आहेत.नवी मुंबईत फुले वसई आणि दादरहून सर्वाधिक प्रमाणात येतात.  पावसात फुले लवकर खराब होत असल्याने नवी मुंबईत येईपर्यंत किमान २० टक्के फुले कोमेजून जातात. विक्री होईपर्यंत त्यात आणखी भर पडते. ही तूट भरून काढण्यासाठी दरवाढ करावी लागते, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

वसईमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक कोलमडून पडली आहे. गेल्या तीन दिवसांत वसईहून फुले आलीच नाहीत, त्यातच नाशिक पुणे परिसरातून फुलांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे फूल बाजारात फुलांचा प्रचंड तुटवडा झाला आहे. जवळपास सर्व फुलांचे दर वाढले असले तरी गुलाबाच्या फुलांच्या किमती मात्र स्थिर आहेत, अशी माहिती सतीश माळी या घाऊक फूल व्यापाऱ्याने दिली.

फुलांचे दर

फुले             पावसापूर्वी      सध्या

रजनीगंधा       ६०     १०० ते १२०

तुळस          २५ ते ३०       ६०

जास्वंद            ३०            ९०

जुई                  २०            ७०

झेंडू                  ३०     ८० ते १००

तगर                २०/३०  ७० ते ८०