जेएनपीटी बंदर तसेच उरण, पनवेल व नवी मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे कोंडणारा श्वास मोकळा होणार आहे. या मार्गावरील करळ, जासई आणि गव्हाण फाटा येथे २०१८ पर्यंत उड्डाण पुलांचे व आठ पदरी रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती रस्ते विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यासाठी मार्च २०१६ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. तर २०१८ पर्यंत रस्ते रुंदीकरण व उड्डाण पुलांचेही काम पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावाही करण्यात आलेला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी व पर्यायी मार्गासाठी सुरू असलेल्या लढय़ालाही यश येताना दिसत आहे.
उरण व जेएनपीटी बंदर परिसर तसेच द्रोणागिरी नोडमधील पागोटे, खोपटे, धुतूम त्याचप्रमाणे करळ, दास्तान जासई व गव्हाण फाटा या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. सध्या जेएनपीटी बंदरात जेएनपीटीसह दोन खासगी बंदरे मिळून तीन बंदरे कार्यान्वित आहेत. तर २०१७-१८ पर्यंत चौथ्या बंदराचेही काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे येथील जड व इतर वाहनांतही वाढ होणार आहे. उरण-पनवेल महामार्ग तसेच जेएनपीटी ते गव्हाण फाटादरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या दररोजच्या अपघातांमुळे अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातग्रस्तांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी जेएनपीटी प्रशासनाकडे येथील सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. त्यावर प्रशासकीय पातळीवर चर्चाही सुरू आहे. अशा वेळी जेएनपीटी, सिडको आणि रस्ते विकास प्राधिकरण यांच्या भागीदारीतून जेएनपीटी ते गव्हाण फाटादरम्यानच्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी करळफाटा, दास्तान जासई व गव्हाण फाटा या तीन्ही ठिकाणी उड्डाण पुलांची उभारणी करण्यात येणार असून, त्याची सुरुवात मार्च २०१६ पासून करण्यात येणार असल्याची माहिती रस्ते विकास प्राधिकरणाचे प्रकल्पाधिकारी प्रशांत फेगडे यांनी दिली आहे. तसेच यापैकी करळ फाटय़ावर रेल्वे उड्डाण पूल, तर दास्तान जासई ते शंकरमंदिर सहापदरी व नवी मुंबई ते राष्ट्रीय मार्ग अशी उड्डाण पुलांची उभारणी करण्यात येणार आहे. यावेळी होणाऱ्या रस्ता रुंदीकरणासाठी जासई परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येणार असल्याने त्यांना मोबदला मिळेपर्यंत काम सुरू करू देणार नसल्याचे सुरेश पाटील म्हणाले.