15 December 2017

News Flash

अगत्याने पाहुणचार

मुंबईतील मराठा मोर्चासाठी अन्य जिल्ह्य़ांतून आलेल्या पाहुण्यांचा नवी मुंबईने अगत्याने पाहुणचार केला.

प्रतिनिधी, नवी मुंबई | Updated: August 10, 2017 1:39 AM

वाशी बाजार, तांडेल मैदानात मोर्चेकऱ्यांना भोजन, अल्पोपाहार

मुंबईतील मराठा मोर्चासाठी अन्य जिल्ह्य़ांतून आलेल्या पाहुण्यांचा नवी मुंबईने अगत्याने पाहुणचार केला. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजारात आणि सीवूड्स स्थानकाजवळील तांडेल मैदानात हजारो मोर्चेकऱ्यांनी मंगळावरी संध्याकाळपासून बुधवारी पहाटेपर्यंत मुक्काम केला. तिथे त्यांची योग्य बडदास्त ठेवण्यात आली होती.

एपीएमसी, गणपतशेठ तांडेल मैदान, तेरणा कॉम्प्लेक्स आणि खारघर येथील सेंट्रल पार्क परिसरात शेकडो वाहने आणि हजारो मोर्चेकरी होते. मोर्चेकऱ्यांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची, आंघोळीची, हात-पाय-तोंड धुण्याची सोय करण्यात आली होती. मोर्चेकऱ्यांच्या न्याहरीची व्यवस्था करण्यात आली होती. पहाटेपासून मोर्चेकऱ्यांनी मुंबईची वाट धरली. नवी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांतून मोर्चेकरी मुंबईला रवाना झाले. त्यानंतर मंगळवारी दुपारपासून गजबजलेल्या नवी मुंबईत शुकशुकाट पसरला.

सानपाडा येथे शीव-पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलाखाली न्याहरीची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय सानपाडा येथील दत्त मंदिर परिसर, एपीएमसीतील कांदा-बटाटा बाजार, मसाला बाजाराच्या आवारात अल्पोपाहार व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली, नगर, परभणी, अकोला, सोलापूर, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांतील वाहनांची व्यवस्था सानपाडा व तुर्भे एपीएमसी बाजाराच्या आवारात करण्यात आली होती. पहाटे हजारो मोर्चेकरी कांदा-बटाटा बाजारातून सानपाडा रेल्वे स्थानकापर्यंत गेले. त्या वेळी त्यांनी ‘एक मराठा लाख मराठा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देऊन परिसर दणाणून टाकला. शीव-पनवेल मार्गावर मराठा समाजाने अल्पोपाहार व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आमदार नरेंद्र पाटील यांच्या वतीने मोफत जेवण, अल्पोपाहार व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

बाजार बंद

मराठा क्रांती मोर्चामुळे एपीएमसी बाजार बंद ठेवण्यात आला, मात्र बुधवारी सकाळी मोर्चेकरी मुंबईला रवाना झाल्यांनतर म्हणजेच सुमारे आठ वाजल्यानंतर या भागात शुकशुकाट पसरला होता. मंगळवारी सायंकाळ पासून या परिसरात ठिकठिकाणी वाहने पार्क करण्यात आली होती. बाजारातील गर्दी आधी रेल्वे स्थानकाकडे सरकली आणि नंतर सर्व जण भायखळा येथे रवाना झाले. मोर्चामुळे एपीएसमसीतील मसाला, कांदा-बटाटा, धान्य बाजार व फळ बाजार पूर्णपणे बंद होता. तर भाजीपाला बाजार सकाळी आठपर्यंत सुरू होता. मंगळवारी रात्री १० पासून सकाळी सातपर्यंत ५१७ गाडय़ा भाजीपाल्याची आवक झाली. कांदा-बटाटा, मसाला बाजार व धान्य बाजारात वाहने पार्क करण्यात आली होती.

तांडेल मैदानात १६००० मोर्चेकरी

सीवूड्स रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या तांडेल मैदानात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड विभागातील मोर्चेकऱ्यांचा मुक्काम होता. तिथे शिवसेनेचे विजय चौगुले यांसह विजय माने, समीर बागवान, सुमित्र कडू, दिलीप घोडेकर, रंगनाथ औटी या कायकर्त्यांनी त्यांची व्यवस्था केली होती. पहाटे चारपासूनच मोर्चेकऱ्यांना पोहे, चहा-बिस्किटे मोफत देण्यात आली. तांडेल मैदान व त्यासमोरील मोकळ्या मैदानात व रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली होती. आराम बस, टेम्पो, ट्रक, खासगी वाहने अशी जवळजवळ ७०० वाहने तिथे पार्क करण्यात आली होती. १६००० मोर्चेकऱ्यांना न्याहरी देण्यात आली. हे मोर्चेकरी सीवूड्स स्थानकातून मुंबईला रवाना झाल्याने सीवूड्स स्थानकात गर्दी उसळली होती.

First Published on August 10, 2017 1:39 am

Web Title: food facility to maratha morcha in vashi bazaar