राजकीय मेळावे आणि लग्नसमारंभांसाठी जागेचा वापर

करावे गावातील खेळाडूंसाठी एकमेव असलेले गणपत तांडले प्रदर्शनी मैदान खेळासाठी उपलब्धच होत नसल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सततचे राजकीय मेळावे, लग्नसमारंभ, प्रदर्शने यामुळे हे मैदान खेळासाठी उपलब्ध होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. एकीकडे नवी मुंबईत आयोजित केल्या जाणाऱ्या विश्वचषकासाठी पालिकेकडून कोटय़वधींचा खर्च केला जात आहे. फुटबॉल सरावासाठीही मोठय़ा प्रमाणात निधी खर्च करून पालिका नेरुळ व वाशी येथे फुटबॉल मैदाने बनवत आहे. त्यामुळे तांडले मैदानासाठी पालिकेचा हा दुजाभाव का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

करावे गावातील तरुणांसाठी गणपत तांडले प्रदर्शनी मैदान हे एकमेव मैदान खेळासाठी राहिले आहे. पालिका प्रभाग क्रमांक १००मध्ये सेक्टर तीस येथील प्रदर्शन, खेळाचे मैदान, उद्यान या प्रयोजनासाठी राखीव असलेला ४६ हजार ७०२ चौरस मीटरचा भूखंड पालिकेकडे ११ मे २००७ रोजी हस्तांतरित करण्यात आला होता. त्यानंतर या मैदानाला पालिकेने कै. गणपतशेठ तांडेल प्रदर्शनी मैदान असे नामकरणही केले होते.

परंतु खेळाचे मैदान, प्रदर्शनाचे कार्यक्रम व उद्यान या तीनही गोष्टींसाठी जागा विभागण्यात आली नव्हती. सिडकोने या ठिकाणी ‘हेलिपोर्ट’चा फलकही लावला होता. परंतु स्थानिकांनी त्याला विरोध करत आंदोलन करून फलक उखडून टाकला होता. २९ ऑक्टोबर २०१० रोजी भूखंडातील पंच्याहत्तर टक्के जागा खेळासाठी राखीव ठेवण्याची मागणी माजी नगरसेविका रेखा म्हात्रे यांनी केली होती. त्यानुसार या मैदानाच्या वापराचे धोरण निश्चित करण्यात आले. दोन वर्षांपूर्वीच २४ फेब्रुवारी २०१५ रोजी या भूखंडातील २२ हजार चौ.मी.जागा खेळासाठी राखीव ठेवण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला, परंतु पालिकेत मैदान विनियोगाचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर दोन वर्षे उलटूनही याबाबत काहीच कार्यवाही न केल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शहरात जागतिक स्पर्धा होत असताना स्थानिकांसाठी हक्काच्या मैदानाबाबतही कार्यवाही करून द्यावी अशी मागणी केली जात आहे.

करावे गावातील व आजूबाजूच्या परिसरातील तरुणांसाठी हे एकमेव मैदान आहे. परंतु प्रदर्शनासाठी वापरल्या जाणाऱ्या भागामध्ये खेळाचे मैदान असल्याने अनेक अडचणी येत आहेत. खेळासाठी भूखंडाची ७५ टक्के जागा राखीव करण्याचा प्रस्ताव समंत होऊन दोन वर्ष झाल्यानंतरही येथे कोणत्याही प्रकारचे काम केले नाही. भूखंडाच्या विनियोगासाठी त्याचे प्रस्तावानुसार तीन भाग करून त्याची विभागणी करून योग्य सुविधा दिल्या पाहिजेत. परंतु पालिका स्थानिकांच्या हक्कासाठीच्या मैदानाकडे दुर्लक्ष करत आहे.

विनोद म्हात्रे, स्थानिक नगरसेवक

करावे गाव हे नवी मुंबईतील सर्वात मोठे गाव आहे. गावातील तरुणांना खेळण्यासाठी मैदान नाही. याच मैदानात विविध क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात येते. परंतु वापराची जागा निश्चित नसल्याने अनेक अडचणी येतात. मैदानात होणारे लग्नसोहळे व कार्यक्रमानंतर कचरा पडलेला असतो, त्याची स्वच्छता आम्हालाच करावी लागते. तसेच या कार्यक्रमांमुळे खेळासाठी जागा उपलब्ध होत नाही.

निशिकांत तांडेल, फोर्टी प्लस क्रिकेट संघ, करावे