स्वस्तात घर, कार्यालय देतो सांगून ५०० पेक्षा जास्त लोकांची फसवणूक करणाऱ्या आनंद कदम यास वाशी पोलिसांनी अखेर घोडबंदर येथून अटक केली. त्याच्या विरोधात शेकडो फसवणुकीचे गुन्हे दाखल असून गेली काही दिवस तो फरार होता.

रिअलायन्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड व रियाल बिल्डकोन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड नावाची कंपनीद्वारे संचालक आनंद कदम, त्याची पत्नी कविता कदम तसेच इतर काही जणांनी मिळून ही फसवणूक केली. कोथांबे तालुका कर्जत येथे लिबर्टी होर्जन व तेन स्क्वेअर, अलिबाग येथे मरीना व बेन्डसे गाव येथे कोरल लेक या नावाने गृहप्रकल्पाची जाहिराती केली होती. यात पाचशेपेक्षा अधिक लोकांनी पैसे गुंतवले होते. आरोपींनी ‘अम्पयर होम्स’ कर्जपुरवठा करणाऱ्या संस्थेकडूनही कोटय़वधी रुपये घेतल्याची तक्रार दादर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.  पोलीस त्याचा शोध घेत होते. तो घोडबंदर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर  साहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल लंबे यांच्या पथकाने त्याला अटक केली. न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.