सुमारे २० दिवस बांधकाम; वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पामबीच मार्गावर करावे गावाजवळ बांधण्यात येणाऱ्या पादचारी भुयारी मार्गासाठी वाशी ते बेलापूर मार्गावरील वाहतूक करावे सिग्नलच्या पुढे करावे गावापासून पामबीचच्या समांतर मार्गावर वळवण्यात आली आहे. बेलापूर-वाशी मार्गावरील तीन मर्गिकांपैकी एक मार्गिका बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील १५ ते २० दिवस हे महत्वाचे काम सुरु राहणार असून वाहनचालकांनी तेथून सावकाश वाहने चालवावीत, असे आवाहन वाहतूक विभागामार्फत करण्यात आले आहे.

करावेतील अनेक रहिवासी मासेमारी करतात. त्यामुळे त्यांना रोजच खाडी किनारी जावे लागते. रस्ता ओलांडण्यासाठी करावे सिग्नल किंवा अक्षरचौक येथील सिग्नल गाठावा लागतो.  त्यामुळे मच्छीमार पामबीच मार्गावरुनच रस्ता ओलांडून जात असत. यात आजवर १३ नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्याविरोधात ग्रामस्थांनी रास्ता रोको करत पालिकेवरही मोर्चा नेला होता. आता पालिकेने या ठिकाणी पादचारी भुयारी मार्गाचे काम सुरू केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

भुयारी मार्गाच्या कामासाठी करावे गावच्या दिशेने असलेल्या पामबीचच्या समांतर मार्गावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. करावे गावच्या दिशेकडील पामबीच मार्गाच्या तीनही मार्गिका खोदण्यात आल्या आहेत. वाशी-बेलापूर या मार्गिकेवरील काम पूर्ण झाल्यानंतर खाडी किनारी भागातील भुयारी मार्गाचे काम वेगाने सुरू करण्यात येईल. वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली. त्यामुळे नेरुळ, सीवूड्स विभागातील पामबीच मार्गावरील वाहतूक मंदावणार असून, वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेण्यात येईल, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली.

पादचारी भुयारी मार्गाचे काम वेगाने सुरु करण्यात आले असून वाशी ते बेलापूर मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. कोंडी होणार नाही यासाठी खबरदारी घेतली आहे. चालकांनी सहकार्य करून वाहने सावकाश चालवावीत.

– प्रमोद शिंदे, वाहतूक अधिकारी, सीवुड्स

पादचारी भुयारी मार्गाच्या कामामुळे करावेतील मासेमारी करणाऱ्यांचा अनेक वर्षांचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. नागरिक उदरनिर्वाहासाठी जीव मुठीत घेऊन पामबीच ओलांडून जातात. परंतु आता मासेमारी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

– विनोद म्हात्रे, नगरसेवक

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For the subway changes in palm beach traffic
First published on: 21-09-2018 at 03:29 IST