नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर शनिवारी रात्री पॅराशूटद्वारे एक व्यक्ती उतरल्याचा प्रकार समोर आला असून पॅराशूटमधून उतरल्यावर ती व्यक्ती कारमधून आलेल्या व्यक्तीसोबत निघून गेली आहे. हा प्रकार समजताच आता नवी मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला असून पॅराशूटमधून उतरलेली व्यक्ती महिला होती, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे पॅराशूटमधून आलेली ती परदेशी महिला कोण, अशी चर्चा आता स्थानिकांमध्ये सुरू झाली आहे.

घणसोलीतील पाम बीच मार्गावर शनिवारी रात्री स्थानिकांना संशयास्पद पॅराशूट उडताना आढळले. या पॅराशूटद्वारे एक महिला पामबीच मार्गावर उतरली आणि नंतर कारमधून आलेल्या व्यक्तीसोबत निघून गेली, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. स्थानिकांनी महिलेकडे चौकशी करण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, महिला स्थानिकांकडे दुर्लक्ष करुन कारमधून निघून गेली, असे सांगितले जाते.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी तपास देखील सुरु केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु केला आहे. सीसीटीव्हीत दोन व्यक्ती चालत जात असल्याचे निदर्शनास आले असले तरी पॅराशूटद्वारे उडताना कोणीही आढळले नाही, असे सूत्रांनी सांगितले. पॅराशूटमधून उतरलेली ती परदेशी महिला कोण, याबाबत स्थानिकांमध्ये चर्चा रंगली आहे.