आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत उदासिनता

विकसित होत असलेल्या उरण शहर तसेच गावांमध्ये आढळणाऱ्या विषारी वन्यजीवांपासून नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पेलणाऱ्या निसर्ग प्रेमी आणि सर्पमित्रांना वनविभागाची अनास्था सहन करावी लागत आहे. कारण या सापांना पकडून सुखरूप जंगलात सोडण्याचे काम करताना निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन तर सर्प मित्रांकडून केले जातच आहे. पण हे करताना जर चुकून विषारी दंश झाल्याच त्यावर आवश्यक सुविधा पुरविण्यातही वन विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने सर्प मित्रांचे जीव धोक्यात आले आहेत.

असाच काहीसा प्रकार हा करंजा येथील मुकेश थळी या सर्प मित्रासोबत घडला आहे. त्यांच्या गावातील एका घराच्या अंगणात साप असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या सापाला पकडताना मुकेशला सर्पदंश झाला. या वेळी त्याला तातडीने उरणच्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचे प्राण वाचले. मात्र मुकेश सुदैवी होता, त्यामुळे हे घडले. मात्र सर्पदंश झाल्याने सर्पमित्राच्या जीवावर बेतल्याचे प्रकार यापूर्वीही उरण मध्ये घडले आहेत. तरीही निसर्गाविषयी असलेली आस्था आणि सापांची होणारी हत्त्या बंद करण्यासाठी सर्पमित्र म्हणून काम करणाऱ्यांची संख्या सध्या वाढत आहे. यामुळे नागरिकांमध्ये विषारी वन्यजीवांविषयीची जागृती आणि निसर्गाचे संवर्धनदेखील होत आहे. परंतु ही जबाबदारी शासन यंत्रणेची असल्याचे भान कर्मचारीवर्गात नसल्यामुळे त्यांचा या सर्पमित्रांचा जीव पणाला लावला जात आहे. याकडे वन विभागाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

वन विभागाकडून उरणमधील सर्पमित्रांना सर्प हाताळताना कोणती काळजी घ्यावी. तसेच कोणकोणती अवजारे असावीत, या बाबतची माहिती दिली जाते. तसेच वनविभागाच्या सहकार्यानेच हे काम करावे, अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. तसेच सर्पमित्रांची माहिती घेऊन त्यांना अधिकृत सर्पमित्र म्हणून ओळखपत्र देण्याचेही काम सुरू असून वन विभागाकडून आर्थिक किंवा साहित्याची मदत केली जात नाही, हे सत्य आहे.

बी. डी. गायकवाड, वन अधिकारी, उरण विभाग.

जीव धोक्यात घालून आम्ही वन विभागाला सहकार्य करतो. पंरतु ज्या वेळी दंश होतो, त्या वेळी आमचा खर्च आम्हालाच करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने आमचा विमा काढवा तसेच आर्थिक मदत करावी, एवढीच मागणी आहे.

रघुनाथ नागवेकर, सर्पमित्र.