वेळ पडल्यास जेल भरो आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामकाजावर माजी मंत्री गणेश नाईक यांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाचा कारभार हुकूमशाहीच्या दिशेने सुरू असल्याची टीका करीत त्याविरोधात वेळ पडल्यास जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा नाईक यांनी दिला आहे. गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्या वेळी त्यांनी हा इशारा दिला आहे.

कायदा राबवताना तो लोकशाही पद्धतीने राबविला गेला पाहिजे, परंतु तसे न होता कायद्यांवर बोट ठेवून हुकूमशाही पद्धतीने सध्या नवी मुंबईचा कारभार सुरू असल्याची खंत नाईक यांनी व्यक्त केली. तर अशा प्रकारचा कारभार बंद करण्यासाठी माजी महापौर सागर नाईक, माजी खासदार संजीव नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे नेते जेल भरो आंदोलन करतील असा इशारा नाईक यांनी दिला.

भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात कंबर कसली असताना आता राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनीही अप्रत्यक्षरीत्या मुंढेच्या विरोधात दंड थोपटल्याने आयुक्त व नाईक यांच्यात कसोटी लागणार आहे.