विनयभंगाच्या गुन्ह्यामुळे अडचणीत आलेले माजी आमदार मंगेश सांगळे यांना सोमवारी न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला. न्यायालयाने मंगेश सांगळे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला असून आता २८ मार्च रोजी पोलीस न्यायालयात बाजू मांडतील आणि त्यानंतर मंगेश सांगळे यांच्या अटकपूर्व जामिनाबाबत पुढील निर्णय होणार आहे.

मंगेश सांगळे हे मनसेच्या तिकिटावर विक्रोळीतून आमदार म्हणून निवडून आले होते. २०१४ मधील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी मनसेमधून भाजपात प्रवेश केला होता. ऐरोलीत राहणारे एक कुटुंब मंगेळ सांगळे यांच्या परिचयाचे आहे. या कुटुंबातील १९ वर्षांच्या तरुणीने मंगेश सांगळे यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सांगळे पसार झाले होते. सोमवारी सांगळे यांनी न्यायालयातून अंतरिम अटकपूर्व जामीन मिळवला आहे. २८ मार्च रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे अशी माहिती रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरे यांनी दिली.

काय आहे प्रकरण ?
मंगेश सांगळे यांनी धावत्या कारमध्ये माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला होता. मी मंगेश सांगळे यांना घरी सोडा अन्यथा आरडाओरडा करु, अशी धमकी दिल्यानंतर मंगेश सांगळे यांनी मला घरी सोडले, असे पीडितेने तक्रारीत म्हटले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ही घटना घडली होती.  याच महिन्यात तरुणीची सहामाही परीक्षाही होती. सांगळेसोबतचे कौटुंबिक संबंध पाहता पीडितेने सुरुवातीला आई-वडिलांना याबाबत माहिती दिली नाही. मात्र, पालकांना ही बाब लक्षात येताच त्यांनी मुलीशी संवाद साधला आणि तिला बोलते केले. मुलीने माहिती देताच त्यांनी रबाळे पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला.