नवी मुंबई : नुकतीच मुंबईत पोलीस मुख्यालयात प्रशिक्षण विभागात बदली झालेले नवी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजयकुमार यांना करोनाची लागण झाली आहे.

त्यांच्या वाहनचालक आणि त्यांच्या समवेत राहणाऱ्या अन्य एका कर्मचाऱ्याला करोना संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांनीही तपासणी केली होती. यात संजयकुमार यांचाही अहवाल होकारात्मक आला आहे. ३ सप्टेंबर रोजी त्यांनी पदभार सोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचा करोनाचा अहवाल आला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या निरोपाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांना काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे. संजयकुमार यांनी स्वत:ला करोनाची लागण झाल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे.

संजयकुमार यांची नुकतीच बदली झाली असून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यांचे नवी मुंबईत स्वागतच दंगलीच्या घटनेने केले होते. मात्र त्यांनी केवळ तीन दिवसात दंगलीची परिस्थिती नियंत्रणात आणली होती. नेरुळ येथून अपहरण प्रकरणाचा तपासही पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. कुठलेही धागेदोरे नसताना या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली होती, तर करोना काळात स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ निर्यात करणाऱ्या टोळीला अटक केली आहे.

करोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरण्यात येत असलेल्या रबरी हातमोज्यांचा पुनर्वापर करणाऱ्या टोळीलाही त्यांनी अटक केली आहे. त्यांच्या काळात अनेक वाहनचोरी प्रकरणांची उकल झाली, तसेच उरण जेएनपीटी भागात कंटेनर ट्रक चोरी करणाऱ्या टोळीलाही त्याच्या काळात अटक करण्यात यश आले. यासह अनेक महत्वाच्या गुन्ह्यंचा तपास त्यांच्या कार्यकाळात झाला आहे. साबरसेलसाठी स्वतंत्र विभाागही त्यांनी तयार केला आहे. संजयकुमार यांची नवी मुंबईत आयुक्त म्हणून दोन वर्षे कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची बदली पोलीस मुख्यालयात अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून झाली असून त्यांना नवी मुंबईत असतानाच करोनचा संसर्ग झाला आहे.