दिघा येथील अनधिकृत बांधकामे थाटलेल्या बांधकाम व्यावसायिकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असून नागरिकांनी रबाले एमआयडीसी पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यानुसार शनिवारी रबाले एमआयडीसी पोलिसांनी चार बांधकाम व्यावसायिकांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. यामुळे दिघा येथील बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

एमआयडीसी आणि सिडकोच्या जागेवर दिघा परिसरात बिल्डरांनी अनधिकृतपणे ९४ इमारती उभारल्या असून यांवर उच्च न्यायालयाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार एमआयडीसीने तीन निवासी इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. तर केरु प्लाझा, शिवराम, पार्वती व पांडुरंग अपार्टमेंटमधील रहिवाशांनी बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यानुसार रबाले एमआयडीसी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकरमेश खारकर, किशोर कोळी, नितीश मोकाशी, मुकेश मढवी यांना अटक केली आहे. तर यासंदर्भात रबाले एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहे.