आरोग्यसेवा सुधारण्याची चिन्हे

नवी मुंबई तज्ज्ञ डॉक्टरांचे निलंबन, राजीनामे, औषधांचा तुटवडा, सुविधांची कमतरता अशा अनेक कारणांमुळे ढासळलेला महापालिका रुग्णालयांचा कारभार आता ताळय़ावर येण्याची चिन्हे आहेत. पालिकेच्या सेवेत मंगळवारपासून चार डॉक्टर रुजू झाले असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळण्याची आशा आहे.

महापालिका रुग्णालयात दोन डॉक्टरांना निलंबित केल्याने तीन डॉक्टरांनी राजीनामे दिले होते. वाशी, ऐरोली, नेरुळ तसेच बेलापूरमधील रुग्णालयांत डॉक्टरांची कमतरता आहे. डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णालयांतील अतिदक्षता विभागासह अन्य काही विभाग बंद आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचाराविनाच परतावे लागत असून खासगी उपचार घ्यावे लागत आहेत.

महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन नवीन डॉक्टर भरतीचा निर्णय घेऊन थेट भरती प्रक्रिया सुरू केली. गेल्या शुक्रवारी डॉक्टरांच्या मुलाखती घेतल्यानंतर मंगळवारपासून दोन फिजिशियन आणि दोन प्रसूतीतज्ज्ञ पालिका रुग्णालयांच्या सेवेत रुजू झाले. याखेरीज सर्व सेवा भरती प्रक्रियेसाठीचा आकृतीबंध शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

सात कोटींच्या औषध खरेदीचा प्रस्ताव

पालिका रुग्णालयांत औषधांचाही तुटवडा भासत आहे. रुग्णांना औषधे बाहेरून विकत घ्यावी लागत आहेत. अनेक महत्त्वाची औषधेदेखील रुग्णालयात उपलब्ध नाहीत. यावर्षी पालिकेने आर्थिक संकल्पात आरोग्य सेवेकरिता दोनशे कोटीपर्यंत तरतूद वाढवली आहे. आत्तापर्यंत पालिकेसाठी २ कोटी ८८ लाख रुपयांची औषध खरेदी झाली होती. यावर्षी प्रथमच मोठय़ा प्रमाणात औषध खरेदी करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पुढील सहा महिन्यांसाठी ७ कोटी रुपयांच्या औषध खरेदीचा प्रस्ताव  स्थायी समितीत मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.