बियाण्यांच्या व्यवसायात मोठा नफा मिळवून देण्याच्या अमिषाने येथील शेतकऱ्यांना फसवणाऱ्या एका टोळीला खांदेश्वर पोलिसांनी अटक केली. यात एका नायजेरियन नागरिकाचा समावेश आहे. समाजमाध्यमाचा वापर करून एका शेतकऱ्याला गंडा घालण्याच्या ही टोळी तयारीत होती; मात्र शेतकऱ्याच्या सावधानतेमुळे आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे हा बनाव उघड झाला. या टोळीने शेतकऱ्याकडून तीन लाख रुपये घेण्याचे ठरवले होते.
सांगलीतील अमरसिंह सूर्यवंशी यांची फेसबुक पेजवर काही महिन्यांपूर्वी कॅथरीन डोयल नावाच्या व्यक्तीची ओळख झाली. कॅथरीनने सूर्यवंशी यांना कोमासीड्स हे बीयाणे विकत मिळते का, ते मिळाल्यास मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो, असे एका संदेशाद्वारे कळवले. त्यानंतर कॅथरीनने काही आठवडय़ांनी फेसबुकवरून प्रियांका जैन नावाच्या महिलेचा मेलआयडी सूर्यवंशी यांना दिला. यात जैन हिचा दूरध्वनी क्रमांक होताच. सूर्यवंशी यांनी प्रियांकाशी बोलणे सुरू केले. साधारण २५० ग्रॅम कोमासीड्सची बाजारातील किंमत एक लाख ६० हजार रुपये इतके होते. सूर्यवंशी यांनी साडेसहा लाख रुपयांचे बियाने विकत घेण्याची तयारी दर्शवली.
या व्यवहारासाठी गुरुवारी सायंकाळी खांदेश्वर येथील किबा हॉटेल हे ठिकाण ठरविण्यात आले. त्यानंतर काही वेळाने हे भेटण्याच्या स्थळामध्ये बदल करण्यात आला. त्यामुळे सूर्यवंशी यांना त्याचा संशय आला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई यांनी पथकाद्वारे टोळीवर पाळत ठेवली. सायंकाळी साडेपाच वाजता यासाठी वाशी रेल्वेस्थानकाजवळ सापळा लावण्यात आला. त्याच वेळी कोपरखैरणे येथील इस्मितसिंग अरोरा पोलिसांनी तेथून ताब्यात घेतले.