नवी मुंबई : मूळ ई-मेलशी साम्य असणारा ई-मेल आयडी तयार करून त्याद्वारे  हायवा कंपनीची २१ कोटी ८९ लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हायवा कंपनीची एक महापे येथे असून मुख्यालय नेदरलँड येथे आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नवी मुंबई कार्यालयातील तीन वरिष्ठाना कामाविषयी मेल पाठवला होता. काही दिवसांनी याच ई-मेल आयडीवरून एक कंपनी आपण ताब्यात घेत असून त्यासाठी निधी जमा करावा असा ई-मेल आला.  विश्वास ठेवून दिलेल्या बँक खत्यात तीन वेळा पैसे पाठविण्यात आले.  शंका आल्याने चौकशी केली असता  मुख्यालयातून अशी कुठलीही कंपनी घेतली नसून पैसेही मागवण्यात आले नाहीत आणि पाठवलेले पैसे आमच्या खात्यात जमाही झालेले नाहीत असे उत्तर मिळाले. फसगत झाल्याचे लक्षात आल्याने कंपनीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा पूर्ण प्रकार ३१ मे ते ३० जून दरम्यान घडला, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील कदम यांनी दिली.