रुग्ण, नातेवाइकांसाठी ‘झिलिका फाऊंडेशन’कडून मोफत सुविधा

देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत उपचारासाठी येणारे कर्करुग्ण केवळ निवास आणि भोजनाची व्यवस्था नसल्याने उपचार अर्धवट सोडून जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. या रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची हीच समस्या लक्षात घेऊन ‘झिलिका फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेने ऐरोली येथे तीन ठिकाणी कर्करुग्ण वसतिगृहे सुरू केली आहेत. या रुग्णांचा सर्व खर्च फाऊंडेशन करते. टाटा रुग्णालयात ने-आण करण्यासाठी एका खासगी बसचीदेखील व्यवस्था केली आहे.

वाढती रुग्णसंख्या पाहता टाटाने खारघर येथे दुसरे रुग्णालयदेखील सुरू केले आहे. आर्थिक कणा मोडलेले हे रुग्ण आणि त्यांच्या सोबत येणाऱ्या नातेवाईकांची मुंबईत राहण्याची व्यवस्था होईल याची मात्र खात्री नसते. त्यामुळे रबाळे एमआयडीसीत दोन इंजिनीअरिंग कारखाने असलेले उद्योजक के. आर. गोपी यांनी या रुग्णांच्या सेवेसाठी चार वर्षांपूर्वी ‘झिलिका फाऊंडेशन’ची स्थापना केली. या फाऊंडेशनच्या माध्यमातून टाटामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची निवास व्यवस्था केली जात आहे. त्यासाठी गोपी यांनी आपली दोन घरे आणि दोन कार्यालयांच्या जागा कॅन्सर हॉस्टेल म्हणून विकसित केल्या आहेत. ऐरोली सेक्टर सहामधील रूपमाया सोसायटीत असलेल्या तीन हजार चौरस फुटांच्या कार्यालयांत या रुग्णांची व्यवस्था केली आहे.

ऐरोली आपले कार्यालय  त्यांनी रुग्णसेवेसाठी समर्पित केले. तिथे आठ रुग्ण आणि १६ नातेवाईक राहतात. ऐरोली सेक्टर-८ अमधील यशोदीप सोसायटीतील नऊ हजार ४०० चौरस फुटांच्या घरात ११ रुग्ण आणि त्यांचे ११ नातेवाईक राहतात. याच परिसरातील वंदावन सोसायटीत पाच रुग्ण आणि पाच नातेवाईक राहतात. रबाळे एमआयडीसीतील कारखान्याच्या एका बाजूला दोन हजार चौरस फुटांचे एक सभागृह बांधून केवळ फुप्फुसांचा कर्करोग असलेल्या रुग्णांसाठी वसतिगृह तयार केले जात आहे. त्यात १५ रुग्ण आणि तेवढय़ाच नातेवाईकांची निवास व्यवस्था केली जाणार आहे. याचा खर्च गोपी उद्योग व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यातून करतात.

राजकारणात बरीच पदरमोड केली पण त्यातून आनंद मिळाला नाही, पण या कामातून समाधान मिळते. रुग्णांसाठी वातावरण प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ ठेवावे लागते. त्यामुळे अनेक ठिकाणी विस्तारलेली ही वसतिगृहे एकाच छताखाली आणता आली तर उपयुक्त ठरेल. त्यासाठी सिडकोकडे भूखंडाची मागणी केली जाणार आहे. त्या जागेवर अद्ययावत असे राज्यातील पहिले कर्करुग्ण वसतिगृह उभारण्याची इच्छा आहे.  – के. आर. गोपी., अध्यक्ष, झिलिका फाऊंडेशन, नवी मुंबई</strong>