सर्वसामान्य रुग्णांना दिलासा; १ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत मोफत उपचार दिले जात असले तरी बाहेरील औषधांसाठी रुग्णांना पैसे मोजावे लागत होते. औषध घेण्यासाठी दिली जाणारी ‘औषध चिट्टी’ आता बंद करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला असून १ फेब्रुवारीपासून याची अंमलबजावणी होणार आहे.
करोनानंतर महापालिका प्रशासनाने आपल्या आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रित करीत सक्षम आरोग्य सेवा देण्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. पहिल्या टप्प्यात गेली अनेक वर्षे पायाभूत सुविधांनी सज्ज असलेली माताबाल रुग्णालयांतील सेवा वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. नेरुळ आणि ऐरोली या दोन रुग्णालयात अतिदक्षता व औषधोपचार हे दोन विभाग सुरू करीत येथील खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे. पुढील टप्प्यात या ठिकाणी उर्वरित सुविधांत वाढ करण्यात येणार असून शस्त्रक्रिया विभागही सुरू करण्यात येणार आहेत. नुकतेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सुविधांचे उद्घाटनही केले आहे.
आता १ फेबुवा्ररीपासून आणखी एक महत्त्वाचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. पालिका रुग्णालयांत ‘औषध चिठ्ठी’ ही पद्धतच बंद करण्यात येणार आहे. पालिका रुग्णालयात मोफत उपचार होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळतो. काही औषधे पालिका पुरवते. मात्र बहुतांश औषधे बाहेरून घ्यावी लागतात. यासाठी पालिकेचे वैद्यकीय अधिकारी रुग्णांना औषध चिट्टी देतात. मात्र आता ही पद्धतच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जी औषधे सातत्याने व मोठय़ा प्रमाणात लागतात तसेच जी औषधे कमी प्रमाणात लागतात यांची वर्गवारी करीत त्याचा आवश््यक पुरवठा पालिका रुग्णालयांतच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना आता मोफत उपचाराबरोबर आवश्यक सर्व औषधेही दिली जाणार आहेत. पालिका प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे.
तपासण्याही मोफत
औषधांबरोबर पालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना विविध प्रकारच्या तपासण्या बाहेरून कराव्या लागत आहेत. पालिकाकडे यापूर्वी तशी व्यवस्था नव्हती. मात्र करोनानंतर पालिकेची स्वतंत्रा प्रयोगशाळा नेरुळ येथील पालिकेच्या रुग्णालयात सुरू झाली आहे. आता या ठिकाणी करोना चाचण्यांची तपासणी होत आहे. मात्र करोनास्थिती पूर्ववत झाल्यानंतर ही प्रयोगशाळा इतर तपासण्यांसाठी उपयोगात येणार आहे.
सध्या महानगरपालिका रुग्णालयांत काही अंशी औषधे मोफत दिली जातात आणि काही औषधांची तांत्रिक कारणास्तव बाहेरून आणावी लागतात. मात्र १ फेब्रुवारीपासून वाशी ,नेरुळ व ऐरोली या तीन रुग्णालयात आंतररुग्ण व बाह्यरुग्ण अशा दोन्ही सेवांमधील रुग्णांना सर्व प्रकारची १०० टक्के औषधे महानगरपालिकेच्या वतीने मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
–अभिजीत बांगर, आयमुक्त, महापालिका
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 20, 2021 1:50 am