कोपरखरणेत वारंवार वीजपुरवठा खंडित

नवी मुंबई कोपरखरणे परिसरात वारंवार खंडित वीजपुरवठय़ामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रविवारी मध्यरात्री रोहित्र ऑइलची गळती होत शॉर्ट सर्किटमुळे वायर जाळून खाक झाल्याने खंडित झालेला वीजपुरवठा १२ तासांनंतर सुरू झाला. मात्र ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली असून कधीही पुरवठा खंडित होऊ शकतो. कोपरखैरणे सेक्टर १९ ए, बी व सीचा काही भाग रात्रभर अंधारात होता.

उन्हाळा असल्याने विजेची मागणी वाढली असल्याने अधिक दाब आल्याने विद्युतपुरवठा खंडित होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र मागणी वाढणार असल्याने त्या अनुषंगाने महावितरण उपाययोजना का करीत नाही, असा सवाल येथील ग्राहक करीत आहेत.

रविवारी मध्यरात्री विद्युतपुरवठा खंडित झाल्याने पूर्ण रात्र उकाडय़ात जागून काढावी लागली. अनेकांनी गच्चीचा सहारा घेतला. रात्री वितरण कार्यालयावर अनेकांनी धडक मारली. या वेळी कर्मचारी व नागरिक यांच्यात बाचाबाची झाली. पोलिसांना माहिती मिळताच कोपरखैरणे पोलिसांचे एक पथक पाठवले. पोलिसांनी वीज ग्राहकांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली.

ढिसाळ कारभार

रोहित्र दुरुस्त करण्यासाठी नेमलेल्या एजन्सीचे प्रतिनिधी संध्याकाळी चार वाजता येणार होते. मात्र ते शेवटपर्यंत आलेच नाहीत. उद्या (मंगळवारी) सकाळी दहा वाजता ते दुरुस्तीचे काम सुरू करीत असल्याने सकाळी दहापासून पुन्हा विद्युतपुरवठा खंडित केला जाणार आहे. याबाबत माहिती देताना कनिष्ठ अभियंता चेतना सिंह यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी दहापासून ही दुरुस्ती होणार असून त्याला एक किंवा दोन तास लागू शकतील, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे.