उरणमधील फ्रेण्ड्स ऑफ नेचर या संस्थेच्या तरुणांकडून होत असलेल्या समाजकार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या तरुणांनी चिरनेरपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेली एक आदिवासी वाडी दत्तक घेतली असून तेथील रहिवाशांना आरोग्य, शिक्षण तसेच नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. याच वाडीत असलेल्या एका ४२ वर्षीय व्यक्तीला कुष्ठरोगाची लागण झाल्याने त्याचा एक पाय कापावा लागला. या व्यक्तीची काळजी घेत घरातील माणसाप्रमाणे शुश्रूशा करण्यासाठी ही तरुणाई सरसावली. त्यामुळे या कुष्ठरोग्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले असून ते हसू पाहून खूप समाधान मिळत असल्याची भावना या तरुणांनी व्यक्त केली आहे.

या तरुणांमध्ये कोणी वकील, कोणी खासगी कंपनीत उच्चपदावर तर कोणी छोटासा उद्योग व्यवसाय करणारा आहे. यांच्या पत्नीही उच्चशिक्षित आहेत. आपण पुढे गेलो मात्र समाजात आजही अनेक वंचित घटक असून त्यांच्यासाठी काही तरी भरीव कार्य करणे गरजेचे असल्याचे या तरुणांनी ठरविले. त्यामुळे या तरुणांनी ही वाडी वर्षभरासाठी दत्तक घेतली. वाडीवरील शाळेतील मुलांना सुट्टीच्या दिवशी विविध प्रकारचे खेळ शिकविणे, त्यांचा अभ्यास घेणे,त्यांच्यासाठी खाऊ, शैक्षणिक साहित्य देणे यासह वाडीवरील पाणीसमस्या दूर करण्यासाठी विहिरीची स्वच्छता करणे, करमणुकीसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा भरविणे तसेच प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची काळजी घेणे आदी कामे ही तरुण मंडळी करीत आहेत. वाडी दत्तक घेतल्यानंतर अंकुश कातकरी या तरुणाला कुष्ठरोगाची लागण झाल्याचे या तरुणांना समजले. त्यांनी त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही मंडळी आल्यानंतर अंकुश तेथून पळून जायचा, अशी माहिती फ्रेण्ड्स ऑफ नेचरचे अध्यक्ष जयवंत ठाकूर यांनी दिली. यानंतर अंकुशचे मन वळवण्यात आले, मात्र त्याचा आजार वाढल्याने त्याचा एक पाय कापावा लागला. त्यानंतर हरीष पाटील हा तरुण त्याची नियमीत शुश्रूषा करीत आहे. याकामी उदय मोकल, राकेश, अनुज, प्रीतम, निवृत्ती, रोहित, राजेश, गोरख, अविनाश, अंगराज, सचिन, जितू आणि रघू असे एक ना अनेक तरुण सरसावले आहेत. चैनीत जगणाऱ्या व समाजाशी देणेघेणे नसलेल्या तरुणांसाठी हे तरुण आदर्शच ठरावेत.