मुंबई, नवी मुंबईतील फळ व भाजी व्यापाऱ्यांची मातृसंस्था असलेल्या दि फ्रूट अ‍ॅण्ड व्हेजिटेबल र्मचट्स असोशिएशनच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील एकाच व्यासपीठावर येत असल्याने व्यापाऱ्यांचा नियंत्रणमुक्त व्यापाराचा प्रश्न गाजणार आहे. सर्वच व्यापार नियंत्रणमुक्त केल्यास व्यापारी, माथाडी, मापाडी आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या इतर घटकांनी करायचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल थेट बाजारात जाऊन विकता यावा यासाठी केंद्र सरकारने बाजार समिती नियंत्रणमुक्त व्यापार करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. त्यामुळे काही राज्यांनी याची अंमलबजावणी केली आहे, मात्र राज्य सरकारला केंद्र सरकारकडून बाजार समित्यांसाठी कोणताही निधी मिळत नसल्याने केंद्राच्या सांगण्यावरून हा व्यापार मुक्त का करावा, असा सवाल व्यापारी उपस्थित करीत आहेत. अशा प्रकारे नियंत्रणमुक्त व्यापार झाल्याने कोणत्या राज्यांना फायदा झाला हे अगोदर स्पष्ट करण्यात यावे. त्यानंतर राज्य सरकारने नियंत्रणमुक्त व्यापार संकल्पना अस्तित्वात आणावी, अशी भूमिका या व्यापाऱ्यांनी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोर मांडली आहे. त्याला पाटील यांनी सकारात्मक पाठिंबा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांच्या हातात असलेल्या फळ व भाजी बाजारातील व्यापाऱ्यांच्या आग्रहास्तव अनेक पक्षाचे मंत्री व आमदार या कार्यक्रमाला येत आहेत. या व्यापारी व माथाडी यांचे पवार यांच्या बरोबर असलेले अनेक वर्षांचे संबंध लक्षात घेता कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान त्यांना देण्यात आले आहे.

दि फ्रूट अ‍ॅण्ड व्हेजिटेबल र्मचट्स असोसिएशन ही  संस्था  शुक्रवारी मुख्यमंत्री निधीला ११ लाख रुपये मदत देणार आहे.   दुष्काळग्रस्त भागाला यातून मदत व्हावी, अशी अपेक्षा अध्यक्ष चंद्रकांत ढोले यांनी व्यक्त केली.