किरकोळ ग्राहकांना प्रवेश नसल्याचा परिणाम; हापूसला ग्राहकच नाही

नवी मुंबई</strong> : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ बाजारात निवडक ग्राहकांनाच प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे किरकोळ ग्राहक नसल्याने फळांची विक्री २५ ते ३० टक्के कमी झाली आहे. बाजारात सध्या कलिंगड, टरबूज तसेच हापूसचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र करोनामुळे किरकोळ ग्राहक नसल्याने मालाला उठाव होत नाही.

हापूस आंब्याची बाजारात आवक वाढली आहे, मात्र त्यालाही उठाव नाही. बाजारात ४५ हजार पेटय़ा दाखल झाल्या आहेत. मात्र विक्री होत नसल्याने त्याचा दरावरही परिणाम झाला आहे.

गेल्या वर्षी  ४ ते ६ डझनला २ ते ५ हजार बाजारभाव होता. आता ८०० ते २ हजारांपर्यंत भाव उतरला आहे. दरवर्षी बाजारात ८० ते ९० लाख पेटय़ांची आवक होते. यातील ३० टक्के हापूस हा परदेशात निर्यात होत असतो. मात्र निर्यातीवरही परिणाम झाला आहे.

सामाजिक अंतरला हरताळ

फळ बाजारातील गर्दी अद्याप कमी झालेली नसून समाजिक अंतर राखले जात नाही. तसेच स्वच्छतेकडेही दुर्लक्ष होत आहे. व्यापारी सुरक्षात्मक साधने वापरत नाहीत. या ठिकाणी परप्रांतीय कामगार कार्यरत असून ते त्याच ठिकाणी वास्तव्य करतात. एकाच वेळी एका खोलीत १० जण राहत आहेत.  एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण यांनी काही ठिकाणी अद्याप सामाजिक अंतर ठेवून व्यापार केला जात नसल्याचे मान्य करीत तशा वारंवार व्यापाऱ्यांना सूचना करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच अतिरिक्त कर्मचाऱ्यांची  यादी महापालिकेला देण्यात येणार असून त्यांच्या निवासाची व्यवस्थाही करण्यात येईल.