महिन्याकाठी दीड कोटीचे नुकसान; तिकीट दरवाढीची चिन्हे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला रोज पाच लाख तर मासिक दीड कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. दरवाढ कायम राहिल्यास तोटय़ात चाललेल्या एनएमएमटीला हा आर्थिक फटका सहन करण्यासाठी तिकिटाचे दर वाढण्याशिवाय पर्याय राहणार नाही. उपक्रमाने सहा महिन्यांपूर्वीच तिकीट दरात दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता दरवाढ कशी करावी, असा प्रश्न प्रशासनासमोर आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमात एकूण ४८५ बसगाडय़ा आहेत. त्यातील ४५० बस मुंबई, कल्याण-डोंबिवली, उरण, पनवेल या नवी मुंबई क्षेत्राबाहेर ६० मार्गावर धावतात. त्यातील १५० गाडय़ा सीएनजीवर चालवल्या जातात. परिवनह उपक्रमाच्या बससाठी रोज २५ हजार लीटर डिझेल लागते. दरवाढ होण्यापूर्वी ६० ते ६२ रुपये लिटर दराने उपलब्ध असलेल्या डिझेलसाठी उपक्रमाला दररोज १५ ते १६ लाख रुपये खर्च करावे लागत होते. दरवाढ झाल्यानंतर या खर्चात लगेच पाच लाख रुपयांची वाढ झाली आहे. ७० ते ७२ रुपये प्रतिलिटरने मिळणाऱ्या डिझेलचा फटका उपक्रमाला बसला आहे.

पालिकेच्या अनुदानावर चालणाऱ्या या उपक्रमाचा मासिक तोटा आधीच तीन ते साडेतीन कोटींच्या घरात गेला आहे. राज्यातील इतर उपक्रमांपेक्षा हा तोटा कमी आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून विविध उपाययोजना करून उपक्रमाने हा तोटा भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र इंधन, सुटे भाग, कर्मचाऱ्यांचे वेतन, देखभाल यामुळे हा तोटा कमी झालेला नाही. काही आगारांचे व्यापारी संकुलांत रूपांतर करून हा तोटा कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वाशी आगारची निविदा प्रक्रिया सुरू आहे. नवी मुंबई पालिकेने दरवाढ केल्यास त्याला विरोध होण्याची शक्यता आहे, मात्र एमएमआरडीए क्षेत्रातील ठाणे, केडीएमटी, बेस्टने दरवाढीचा प्रस्ताव सादर केल्यास दरवाढ अटळ आहे.

एनएमएमटी आधीच तोटय़ात आहे. दरवाढीमुळे झालेला अतिरिक्त तोटा कसा भरून काढावा हा प्रश्न आहे. सर्व उपक्रमांशी चर्चा करून सामाईक निर्णय घ्यावा लागणार आहे.

– शिरीष आरदवाड, व्यवस्थापक, एनएमएमटी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fuel price hike to damage nmmt
First published on: 22-09-2018 at 03:44 IST