लस वाया जाण्याचे प्रमाण एक टक्का; पनवेलमध्ये मात्र सहा टक्के साठा वाया

नवी मुंबई : १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाल्याने देशभरात लशींचा तुटवडा जाणवू लागल्याने उपलब्ध लससाठ्यातून कुप्या वाया जाण्याचे प्रमाण कमी ठेवून त्यांचा पुरेपूर वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. नवी मुंबई शहरात याबाबत प्रशासनाने काटेकोर लक्ष ठेवले असून येथे लस वाया जाण्याचे प्रमाण जेमतेम एक टक्का इतके आहे. दुसरीकडे पनवेल महापालिका क्षेत्रात मात्र, लस वाया जाण्याचे प्रमाण सहा टक्के इतके आहे.

नवी मुंबईत करोनाचा संसर्ग वाढू लागल्यामुळे अधिकाधिक नागरिक लसीकरण करून घेण्यासाठी धाव घेत आहेत. त्यामुळे सर्वच लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत आहे. अ‍ॅपवर पूर्वनोंदणी करून येणाऱ्यांनाच लसीकरण केंद्रावर प्रवेश देण्यात येत आहे. मात्र, सुरुवातीपासूनच सातत्याने लशींचा तुटवडा जाणवत आहे. पनवेलमध्येही लससाठा उपलब्ध होत नसल्यामुळे केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. अशा वेळी उपलब्ध लससाठ्याचे योग्य नियोजन करणेही महत्त्वाचे ठरू लागले आहे. नवी मुंबई महापालिकेत लस वाया जाण्याचे प्रमाण एक टक्के इतकेच आहे. तर कोव्हॅक्सिनच्या ३४ हजार २४० मात्रांपैकी ११११ मात्रा वाया गेल्या असून हे प्रमाण ३.३ टक्के आहे. ‘लस वाया जाणार

नाही याबाबत अत्यंत बारकाईने खबरदारी घेतली जात आहे. शासनाने लस वाया जाण्याचे कमाल प्रमाण १० टक्के दिले असून नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मात्र अत्यल्प १ टक्के लस वाया जाण्याचे प्रमाण आहे,’ अशी माहिती पालिकेच्या लसीकरण प्रमुख डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी दिली.

दुसरीकडे, पनवेल महापालिका क्षेत्रात लस वाया जाण्याचे प्रमाण सहा टक्क्यांच्या आसपास आहे. ‘पालिकामार्फत केल्या जाणाऱ्या लसीकरणात लस वाया जात नाही. पण पनवेल महापालिका क्षेत्रात खासगी रुग्णालयामार्फत होणाऱ्या लसीकरणात ६ टक्के लस वाया जात आहे,’ अशी माहिती पनवेल महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यात केवळ १२ केंद्रांवरच लसीकरण

ठाणे : जिल्ह्यात करोना प्रतिबंधक लशींच्या तुटवड्यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद असून केवळ १२ केंद्रांवरच

लसीकरण सुरू आहे. या केंद्रांवरही कोविन अ‍ॅपवर नोंदणी केलेल्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाच लस दिली जात आहे. मात्र, नवी मुंबई वगळता इतर ठिकाणी पुढचे काही दिवस आगाऊ नोंदणी झालेली असल्याचे अ‍ॅपवर दाखविण्यात येत असून लसीकरणासाठी

तारखा मिळत नसल्यामुळे अनेक तरुणांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तर, दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकही दुसरा डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांच्या शोधात फिरत असून यातून मंगळवारी जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेरील केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांची गर्दी होऊन गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.