अन्य पक्षांतील नगरसेवकांच्या घरी हजेरी

नवी मुंबईच्या महापौरपदासाठी पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पालिकेतील प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काही इच्छुक उमेदवारांनी गणेशोत्सवात प्रतिस्पर्धी नगरसेवकांकडे जाऊन गणेशदर्शन घेतल्याचे समजते. सध्या पालिकेत अपक्षांच्या टेकूवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. अपक्ष पुरस्कृत नगरसेवक सुधाकर सोनावणे महापौर आहेत. त्यांची अडीच वर्षांची मुदत ९ ऑक्टोबरला संपत आहे.

नवी मुंबई महापौरपदाची निवडणूक रंगतदार होणार आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला १११ जागांपैकी ५२ जागांवर समाधान मानावे लागले. चार अपक्ष आणि १० काँग्रेस नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौरपद टिकविण्यात आले. दोन वर्षांपूर्वी काँग्रेसच्या एका नगरसेविकेचा पाठिंबा मिळवून शिवसेनेने पालिकेची प्रमुख समिती असलेल्या स्थायी समितीचे सभापतिपद मिळवले होते. तेव्हापासून या पक्षाच्या स्थानिक नेत्यांचा महापौरपदावर डोळा आहे. त्याला सार्वजनिक बांधकाममंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पाठबळ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शिवसेनेचे महापौरपदाचे एकमेव उमेदवार विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी १५ दिवसांपासून पालिकेतील सर्व नगरसेवकांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. स्वपक्षाच्या नगरसेवकांच्या घरी आवर्जून गणेशदर्शन घेतले जात आहेच, मात्र त्याचबरोबर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांच्या घरीही गणेशदर्शनाच्या निमित्ताने हजेरी लावली जात आहे. बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि विजय चौगुले यांची विविध कार्यक्रमांत संयुक्त उपस्थिती दिसू लागली आहे. माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांचा औरंगाबादला अपघात झाल्यानंतर हे दोघे त्यांना भेटण्यासाठी गेले होते. प्रवासात महापौरपदावर खलबत झाल्याची चर्चा आहे.

शिवसेनेचे पालिकेतील संख्याबळ ३८ आहे. शिवसेना व भाजपचे ‘स्थानिक सख्य’ पाहता भाजप शिवसेनेला साथ देणार हे निश्चित आहे. त्यामुळे त्यांच्या सहा नगरसेवकांचा पाठिंबा गृहीत धरण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेला ४४ नगरसेवकांची मोट बांधणे शक्य होणार आहे. काँग्रेसच्या १० नगरसेवकांचा जाहीर पाठिंबा मिळाल्यास चौगुले यांना महापौरपदाच्या जवळ जाणे शक्य होणार आहे. शिवसेना, भाजप आणि काँग्रेस यांच्या आघाडीनंतरही तीन नगरसेवकांची आवश्यकता पडणार असून त्यासाठी अपक्ष नगरसेवकांना विशेष समित्यांचे आमिष दाखवून आणि लक्ष्मीदर्शन घडवून जाळ्यात ओढण्याचे काम सुरू आहे.

याशिवाय थेट राष्ट्रवादीच्या बुरुजालाच सुरुंग लावण्याचे काम शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी चौगुले यांच्यासाठी सुरू केल्याचे समजते. निवडणुकीसाठी झालेला खर्चही गेल्या अडीच वर्षांत वसूल करू न शकलेल्या नगरसेवकांची दिवाळी कशी धूमधडाक्यात साजरी होईल, याची काळजी घेतली जात असल्याचे समजते. त्यासाठी चौगुले यांनी राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त हजेरी लावली आहे.

नरेंद्र पाटील यांच्या घरी मुख्यमंत्री

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या घरी गणेशदर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे गेली अनेक महिने सुरू असलेली पाटील यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा पुन्हा रंगली आहे. पाटील यांचे कोपरखैरणे भागातील राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांवर वर्चस्व आहे. शिवसेनेने महापौर पदाच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यापूर्वीच चौगुले यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादीचा उमेदवार ठरेना

राष्ट्रवादीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. ज्येष्ठ नगरसेवक जे. डी. सुतार, डॉ. जयाजी नाथ आणि माजी महापौर सागर नाईक यांचे सासरे विनोद म्हात्रे यांच्या नावांची चर्चा आहे. काँग्रेस या वेळी महापौरपद मागून राष्ट्रवादीसमोर अडचण निर्माण करेल, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी पक्षात असलेल्या नऊ नगरसेविकांपैकी एकीची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.