घरोघरी नियमितपणे गणपतीचे पूजन केले जात असले तरी गणेशोत्सवात मोठय़ा मूर्तीची प्रतिष्ठापना करून परंपरेनुसार दहा दिवसांनी भक्तिभावाने गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. ठाण्यातील कोळीवाडा परिसरात राहणाऱ्या दिलीप वैती यांनी मात्र गेली २५ वर्षे पाचशेहून अधिक मूर्तीचा संग्रह करून श्रद्धेची अनोखी वाट अनुसरली आहे. दिलीप वैती यांनी आपल्या छंदातून लहान-मोठय़ा गणेशमूर्ती आणि त्यांनी रेखाटलेल्या गणपतीच्या हजारांहून अधिक चित्रांचा संग्रह केला आहे.
दिलीप वैती यांच्या घरी दरवर्षी गणेशोत्सवात गणपतीची प्रतिष्ठापना होत असते. महाविद्यालयात असताना त्यांनी १९८९ साली संग्रहातील पहिली मूर्ती पॉकेटमनीसाठी घरातून मिळणाऱ्या रकमेतून विकत घेऊन घरी आणली. तेव्हापासून आजपर्यंत वेगवेगळ्या आकाराच्या पाचशेहून जास्त गणेशमूर्ती त्यांनी जतन करून ठेवलेल्या आहेत. या गणेशमूर्तीच्या संग्रहात अर्धा इंच इतकी सर्वात लहान मूर्ती ते चार किलो वजनाच्या मूर्तीचा समावेश आहे. दिलीप वैती अशा वेगळ्या आकर्षक मूर्तीच्या शोधात असतात. त्यांची ही आवड ओळखून अनेकांनी काही मूर्ती त्यांना भेट दिलेल्या आहेत. या गणेशमूर्तीसाठी त्यांनी आपल्या घरातील खास खोली राखून ठेवली आहे. गणपतीच्या असंख्य मूर्ती, गणेशाची वेगवेगळी रूपे दर्शवणारी चित्रे आणि भक्तीपर संगीताची धून याने दिलीप वैती यांच्या घरात एक प्रकारचे आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे. यंदाच्या गणपतीचे थाटामाटात विसर्जन झाले असले तरी निरोपानंतरसुद्धा वैती यांच्या घरी बाप्पाची असंख्य रूपे कायम वास्तव्यास आहेत.
लहानपणापासूनच गणेशमूर्तीचे आकर्षण असलेल्या दिलीप वैती यांनी पुढे आपल्या शिक्षणाचा आणि कलेचा उपयोगदेखील गणपतीची अनेक रूपे साकारण्यासाठी केला आहे. जे जे स्कूल ऑफ आर्ट्स या महाविद्यालयातून दिलीप वैती यांनी फाइन आर्ट्सचे शिक्षण घेतले. आवड आणि शिक्षणाचा उपक्रम म्हणून त्यांनी गणपतीची चित्रे काढायला सुरुवात केली.
महाविद्यालयात असतानाच कामाचा भाग म्हणून गणपतीच्या चित्रांसोबत गणपतीसाठी लागणारे मखर तयार करायला त्यांनी सुरुवात केली. २०१० साली दिलीप यांनी काही कलाकारांसोबत ठाण्यात १०७ लहान गणपतीच्या चित्रांमधून १०८ व्या मोठय़ा गणपतीचे चित्र अडीच तासांत साकारून त्यांचा महाविश्वविनायका हा उपक्रम यशस्वी केला. दिलीप आणि त्यांच्या मित्रांनी विश्वविनायका संस्थेची स्थापना करून विधायक कामातून गणेशाची आराधना करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. या संस्थेच्या माध्यमातून गणपतीची चित्रे काढण्याचे प्रशिक्षण, तसेच विशेष मुलांसाठी गणपती चित्रे काढण्याची स्पर्धा घेतली जाते.