डीजेच्या जागी टाळ-मृदंग, पारंपरिक वाद्ये; पालिका, पोलिसांकडून चोख व्यवस्था

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई आणि परिसरात रविवारी लाडक्या गणरायांना शांततेत निरोप देण्यात आला. नवी मुंबईकरांनी उच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणासंदर्भात दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन केले. कुठेही डीजेचा दणदणाट नव्हता. पारंपरिक वाद्ये, भक्तिगीते आणि गणरायाच्या नामघोषात मिरवणुका काढण्यात आल्या, विसर्जन मिरवणुकांत ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी पोलिसांनी आवश्यक उपाययोजना केल्या होत्या. सर्व गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या होत्या. त्यात पोलिसांनी केलेल्या सूचनांचे पालन जवळपास सर्वच गणेशोत्सव मंडळांनी केले. भजन आणि टाळमृदंगांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखे साहाय्यक पोलीस आयुक्त अजय कदम यांनी दिली. कोपरखैरणेत डीजेऐवजी ढोलताशा आणि टाळ-मृदुंगाचा गजर ऐकू आला. ढोलताशांना यंदा अधिक मागणी होती. कोपरखैरणे सेक्टर-८ मधील साईसिद्धी गणेश मित्रमंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन गेली २३ वर्षे डीजेच्या दणदणाटात वा ढोलताशांच्या आवाजात केले जाते. यंदा मात्र पारंपरिक वाद्यांच्या तालावर मिरवणूक काढण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष नितीन हिंगे यांनी सांगितले. कोपरखैरणे परिसरातीलच ‘उमेद प्रतिष्ठान’ या गणेश मंडळाने ढोलताशांचा वापर काही वेळ केला. त्यानंतर महिलांनी पारंपरिक गीते गात गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला.

महापालिका क्षेत्रात एकूण ५२६ सार्वजनिक व ८२५३ घरगुती अशा एकूण ८७७९ श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेने २३ विसर्जनस्थळांवर विसर्जनाचे नियोजन केले होते. उत्तम व्यवस्थेमुळे गर्दीतही भाविकांची गैरसोय झाली नाही. चोऱ्या आणि छेडछाडीला आळा घालण्यासाठी जास्त गर्दी होणाऱ्या विसर्जनस्थळांवर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. आग्रोळी तलाव, चिंचोली तलाव शिरवणे, सेक्टर ६ तलाव वाशी, तुर्भे तलाव, सेक्टर १९ धारण तलाव कोपरखैरणे, रबाळे तलाव, दिवा तलाव, दिघा तलाव अशा आठ विसर्जनस्थळांवर प्रत्येकी १० कॅमेरे लावण्यात आले होते. त्यामुळे विघ्नहर्त्यां गणरायाचा विसर्जन सोहळा निर्विघ्न झाला. सर्वच विसर्जनस्थळांवर मोठय़ा तराफ्यांसोबत फोर्कलिफ्टची व्यवस्था केली होती.

पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त शहर रवींद्र पाटील यांच्या नियंत्रणाखाली, परिमंडळ- १चे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार व परिमंडळ २चे उपायुक्त डॉ. अंबरीश पटनिगिरे संपूर्ण विसर्जन व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा व वाहतूक पोलीस विभागाने योग्य व्यवस्था ठेवली होती.

महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि महापौरांनी विसर्जनस्थळांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली. पालिकेच्यावतीने वाशीतील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात गणेशमूर्तीवर मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात शांततेत व पारंपरिक पद्धतीने गणेशविसर्जन झाले. महापालिकेनेही विसर्जनस्थळांवर चांगली व्यवस्था केली होती. गणेशभक्तांनीही सहकार्य केल्यामुळे विसर्जन सोहळा आनंदी वातावरणात आणि निर्विघ्नपणे पार पडला.  – रवींद्र पाटील, अतिरिक्त आयुक्त, नमुंमपा

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh immersion in maharashtra 2018
First published on: 25-09-2018 at 01:01 IST