गणेश मंडळाचा उपक्रम

उरणमधील शिवराय मित्र मंडळाने यावर्षी दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर कोणताही झगमगाट न करता तरुणाई व नागरिकांना सायबर गुन्ह्य़ांपासून सावध करण्यासाठी विविध माहिती देणारा लघुपट तयार केला आहे. मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांना हा लघुपट दाखविण्यात येत आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून विविध विषय घेऊन जनजागृती केली जाते. यामध्ये निसर्ग, पर्यावरण हे विषय असतातच, मात्र उरणच्या कामठा येथील शिवराय गणेशोत्सव मंडळाने यंदा हा नवा विषय मांडला आहे. सध्या मोठय़ा प्रमाणात पी.सी, लॅपटॉप, स्मार्ट फोन तसेच टॅबचा वापर होतो. इंटरनेट, व्हॉट्स अ‍ॅप तसेच इतर अ‍ॅपच्या माध्यमातून सायबर गुन्ह्य़ांतही वाढ झालेली आहे. त्यामुळे शासनाने अशा गुन्ह्य़ांवर नजर ठेवण्यासाठी खास सायबर सेलची निर्मिती केली आहे. यामध्ये बँकेतून येणाऱ्या कॉलद्वारे फसवणूक करून ग्राहकांच्या एटीएम, डेबिट कार्ड आदींचे पिन विचारून खात्यातून केली जाणारी चोरी, अमूक कोटींची लॉटरी लागली असून संपर्क साधा असे सांगणारा दूरध्वनी, त्यानंतर त्यासाठी इतकी रक्कम भरा अशा प्रकारची मागणी करून लाखो रुपयांची फसवणूक होणे आदी प्रकार घडत आहेत. या प्रकारांपासून सावध कसे रहावे, याची माहिती देण्यासाठी हा लघुपट निर्माण केल्याचे शिवराय मंडळाचे अध्यक्ष सचिन कदम यांनी सांगितले. आमच्या मंडळाने यापूर्वीही असेच सामाजिक संदेश देणारे देखावे केले आहेत, तसेच मंडळातर्फे दरवर्षी रक्तदान शिबीर घेतले जाते, असेही ते म्हणाले.