आमदार पुत्राला पुढे पाठवून शक्तिप्र्दशनाद्वारे भाजप प्रवेश करण्याची तयारी करणारे राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे माजी मंत्री गणेश नाईक यांचा सोमवारी २६ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याचे समजते, मात्र याला नाईक कुटुंबीयांच्या वतीने दुजोरा देण्यात आला नाही.

केंद्र सरकारच्या पुढाकाराने २२ ते २५ ऑगस्ट रोजी ‘वर्ल्ड आयुष एक्पो’ हे भारतीय चिकित्सा प्रणालीवर महाआरोग्य शिबीर वाशी येथील सिडको प्रर्दशन केंद्रात होणार असल्याने हा प्रवेश खुल्या सभागृहात होणार आहे.

राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा देऊन संदीप नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप प्रवेश केलेला आहे, मात्र युती व आघाडी सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्री राहिलेल्या नाईक यांनी हा प्रवेश जाहीररीत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी केंद्रातील ज्येष्ठ मंत्री तसेच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपला प्रवेश व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी हे नाईक यांच्या भाजप प्रवेशासाठी आग्रही असून ठाणे जिल्ह्य़ातील पक्षाचा चेहरा म्हणून त्यांना पुढे आणले जाणार आहे. त्यासाठी केंद्रातील नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वेळेचा मेळ जुळून आला असून पुढील आठवडय़ातील २६ ऑगस्ट रोजी हा प्रवेश होणार असल्याचे समजते.

या प्रवेशाच्या निमित्ताने

नाईक शक्तिप्रर्दशन करणार असून अगोदर पावसाळा सुरू असल्याने सिडको प्रर्दशन केंद्राचा पर्याय निवडण्यात आला होता, पण २२ ते २५ ऑगस्ट रोजी या प्रर्दशन केंद्रात देश-विदेशातील दहा हजार डॉक्टरांचा महामेळावा भरणार असल्याने हा जाहीर प्रवेश आता सानपाडा अथवा करावे मैदानात आलिशान मंडप घालून केला जाणार आहे. त्याची जोरदार तयारी सध्या सुरू आहे.