विशेष समित्यांमध्ये भाजपच्या जुन्या नगरसेवकांना स्थान नाही

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सोमवार विशेष समितीची निवडणूक घेण्यात आलेली. या निवडणुकीत प्रत्येक समितीत एकच अर्ज दाखल  झाल्याने ही निवडणूक बिनविरोध  झाली. मात्र  निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यासाठी विशेष सभा घेण्यात आली. या सभेत भाजप आणि शिवसेनेतील जुना गट हजर नव्हता. पालिकेतील विशेष समिती आणि तदर्थ समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गणेश नाईक यांच्या गटाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या पालिका निवडणुकीत पुन्हा  नाईक यांचे वर्चस्व राहील, अशी चर्चा सुरू आहे.

या निवडणुकीदरम्यान जुने भाजप ६ नगरसेवकांपैकी  भाजप जिल्हा अध्यक्षांसह पाच नगरसेवक गैरहजर राहिले होते. नाईक यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षांतर केले त्यांनतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे पालिकेवर भाजपचे वर्चस्व राहण्यासाठी नवी मुंबई पालिकेची सूत्रे गणेश नाईक यांच्या हातात दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली.

नवी मुंबई पालिकेच्या आठ  विशेष समित्या आणि दोन तदर्थ समितीची निवडणूक रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी पीठासीन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात संगीता अशोक पाटील महिला आणि बालकल्याण समिती, शशिकला पाटील आरोग्य परिरक्षण समिती सभापती, शंकर मोरे, पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण समिती, डॉ. जयाजी नाथ क्रीडा व सांस्कृतिक, लक्ष्मीकांत पाटील, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार, सायली शिंदे विधि समिती, शशिकला सुतार, उद्यान आणि शहर, कविता आंगोडे, विद्यार्थी आणि युवक  कल्याण तसेच दिव्या गायकवाड, पर्यावरण तदर्थ समिती, नेत्रा शिर्के, नवी मुंबई स्वच्छता मिशन तदर्थ समिती या सर्वाची सभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

शिवसेनेचा एकमेव नगरसेवक

हे सर्व सदस्य याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्या वेळी त्यांच्यासोबत ४८ नगरसेवकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या विशेष समिती सभापती निवडणुकीत सर्व नगरसेवक हे नाईक यांच्या गटातील आहेत. त्यामुळे महापालिकेत जुने भाजप गट आणि नाईक गट असे दोन गट पडले आहेत. या निवडनुकीत जुन्या भाजपपैकी एकाला ही संधी न दिल्याने जुन्या भाजप नगरसेवकांत नाराजी पसरली असून ते या सभेला गैरहजर राहिले. शिवसेनेचे एकमेव नगरसेवक संजू वाडे यांनी उपस्थिती दर्शविली होती.