राज्यात भाजप सरकार अस्तित्वात न आल्याने निराश झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे पानिपत करण्यासाठी येत्या चार महिन्यांत होणारी नवी मुंबई पालिकेची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी मंत्री गणेश नाईक यांच्याकडे पालिका निवडणुकीची सर्व सूत्रे दिली जाणार असल्याचे समजते.

संपूर्ण शहरात नाईक यांना सर्वाधिकार दिले गेल्यास बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना पालिका निवडणूक प्रक्रियेत नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे पालिका शिवसेनेच्या ताब्यात असून नवी मुंबई भाजपकडे खेचून आणण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. त्याचवेळी शिवसेना ही मैदानात उतरली असून बैठकांना सुरुवात झाली आहे.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसा महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले आहे. विधानसभा निवडणुकीआधी भाजपचे सरकार सत्तेवर येणार अशी खूणगाठ मनाशी बांधून नाईक यांनी भाजपप्रवेश केला, मात्र सत्तेची समीकरणे पूर्णपणे बदलल्याने नव्याने आखणी करण्याची वेळ भाजपवर आली आहे.

नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता नवी मुंबई पालिकेत आणली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने नाईकांना पूर्ण स्वंतत्र दिले होते. त्यामुळे तीन निवडणुकीत ‘नाईक सांगतील ते धोरण व बांधतील ते तोरण’ असे चित्र होते. १९९५ मध्ये शिवसेनेनेही त्यांना तिकिट वाटपाचे सर्व अधिकार दिल्याने त्यांनी पालिकेत पहिली सत्ता आणली होती. त्यानंतर थोरला मुलगा महापौर व्हावा यासाठी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना साकडे घातले. शिवसेना प्रमुखांनीही नाईकांच्या या सर्वात तरुण महापौराच्या संकल्पेनेला हिरवा कंदील दाखविला. तेव्हापासून नाईक यांची नवी मुंबईत एकहाती सत्ता राहिली आहे. राज्यातील सत्ता गमवावी लागल्याने नाईक यांच्या नवी मुंबईतील सत्ताकारणाला धक्का न लावता पालिकेत भाजपची सत्ता येईल एवढीच अपेक्षा नाईकांकडून व्यक्त केली जाणार आहे.  त्यांना नामोहरण करण्यासाठी शहरात महाविकास आघाडीचा प्रयोगही केला जाण्याचा प्रयत्न होणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या भाजपच्या तालुका अध्यक्ष निवड प्रक्रिया सुरू असून यात नाईकांच्या कलेने घेतले जात आहे. यानंतर जिल्हाध्यक्ष निवडणूक होणार असून विद्यमान अध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या जागी नव्याने अध्यक्ष निवडून येणार आहे.त्यांच्या जागी नाईकांच्या मर्जीतील अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जाते.  पालिका जिंकण्यासाठी नाईकांच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त या प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. त्यामुळे बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना डावलेले जाण्याची शक्यता आहे. एका पक्षात असून नाईक यांच्याशी  कधीही मनोमिनलन होणार नसल्याचे म्हात्रे यांनी निवडणुकीत जाहीर केले होते. म्हात्रे यांना बेलापूर मतदार संघात स्वायत्तता दिल्यास नाईक मोकळेपणाने काम करणार नाहीत, त्यांना स्वातंत्र दिल्यास म्हात्रे प्रचार करणार नाहीत मात्र भाजपने कार्यकर्त्यांचा गोतावळा असलेल्या नाईकांवर विश्वास टाकला जाणार आहे, असे म्हटले जात आहे.

सध्या पक्षात तालुका अध्यक्ष निवडणूक सुरू आहे. त्यानंतर अध्यक्षाची नेमणूक केली जाणार असून भाजपमधील पदाधिकारी प्रक्रिया ठरलेली आहे. यात नवी मुंबईतील भाजपचे प्रमुख पदाधिकारी, आमदार यांच्या सूचनांची दखल घेतली जाणार आहे. येत्या १५ दिवसांत नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या तयारीला आम्ही लागणार आहोत.

-रामचंद्र घरत, अध्यक्ष, भाजप, नवी मुंबई