राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये पुन्हा स्थान
विधानसभा निवडणुकीतील पराभव, त्यानंतर पक्ष सोडण्याची चर्चा, यातून मुख्य प्रवाहापासून काहीसे दूर फेकले गेलेल्या गणेश नाईक यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये स्थान मिळाले आहे. पक्षाच्या सर्व बैठकांना नाईकांना अलीकडे निमंत्रित केले जाते तसेच त्यांना व्यासपीठावर संधी दिली जात आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पक्षाच्या मुख्यालयात आयोजित केलेल्या नेतेमंडळींच्या बैठकीत नाईक व्यासपीठावर उपस्थित होते. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील यांच्याबरोबर नाईकांना पवारांच्या बाजूला बसण्याची संधी देण्यात आली. १५ दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या निवडक नेत्यांच्या बैठकीलाही नाईक हे उपस्थित होते. पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये नाईक यांना पुन्हा एकदा स्थान मिळाले आहे. मधल्या काळात नाईक हे पक्षात फारसे सक्रिय नव्हते. विधानसभेत बेलापूर मतदारसंघातील पराभवानंतर नाईक पक्ष सोडून जाणार असल्याची चर्चा होती. पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाने जबाबदारी सोपवूनही त्यांनी दूर राहणेच पसंत केले होते. नाराज नाईक यांची नंतर शरद पवार यांनी समजूत काढली होती. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या विजयानंतर नाईकांचे महत्त्व पुन्हा वाढले. पक्षातील ज्येष्ठ निवडक नेत्यांमध्ये त्यांना स्थान मिळाले आहे. गणेश नाईक यांच्यासारखा मोहरा गमावून चालणार नाही हे ओळखूनच राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने त्यांना महत्त्व दिले आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकून आपण संपलेलो नाही, हा संदेश गणेश नाईक यांनी दिला आहे. मंत्रिपदी असतानाही नाईक पक्षाच्या कारभारात फारसे लक्ष घालीत नसत. पक्षाच्या मुख्यालयात बैठकांव्यतिरिक्त कधीच फिरकत नसत. अलीकडे मात्र पक्षाच्या बैठकांमध्ये त्यांची उपस्थिती वाढली आहे.

विधान परिषदेवर संधी कोणाला ?
विधान परिषदेच्या ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात पुढील वर्षी निवडणूक होत असून, या मतदारसंघात राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देते याचीही उत्सुकता आहे. चार वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले वसंत डावखरे पुन्हा लढण्यास फार काही इच्छुक नाहीत. बदलते राजकीय संदर्भ लक्षात घेता ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी तेवढी सोपी नाही; पण डावखरे िंकंवा गणेश नाईक यांना रिंगणात उतरवून पक्षाकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली जाऊ शकते. नाईक यांनीही चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे.