शिवसेना शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे यांनी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्याविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शिवसेनेतील अंतर्गत वाद आणखीन चिघळला. या घटनेनंतर चौगुले हे समर्थक नगरसेवकांसह शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करणार असल्याचे समजते.

स्थानिक नेतृत्वाच्या पूर्व परवानगीशिवाय एका मेळाव्याचे आयोजन केल्यावरून समाजमाध्यमांवर जोरदार वाद झडला होता. याचे पर्यवसान थेट चौगुले यांनी शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे यांना कथित शिवीगाळ करण्यात झाली. त्यानंतर त्यांनी म्हात्रे यांना ठार मारण्याची कथित धमकीही दिल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आणि त्यांच्या विरोधात कोपरखैरणे पोलिसांत बुधवारी तक्रार दाखल केली. दरम्यान पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुखांना देण्याच्या मन:स्थितीत असल्याचे चौगुले यांनी स्पष्ट केले. २६ नगरसेवकही सोबत असल्याचे ते म्हणाले.

मातोश्रीवरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून ऐरोलीत प्रचार करू नका, असे आदेश येत नाही तोवर गणेश नाईक यांचा प्रचार करू, असे त्यांनी ठणकावून सांगितले. यावर शिवसेना नेत्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.