शिवसेनेसह राष्ट्रवादीचाही पाठिंबा मिळण्याची चर्चा

गेले दोन दिवस बेलापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींनी गुरुवारी ऐरोली मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. माजी मंत्री गणेश नाईक यांनी ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी मिळवली असून नाईकांचे कट्टर विरोधक मुंबई झोपडपट्टी सुधार समितीचे सभापती विजय नाहटा हे ऐरोलीतून अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. ते शुक्रवारी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याला सेनेची फूस असल्याचे मानले जाते.

नवी मुंबईत गेली काही दिवस राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. महायुतीत दोन्ही जागा भाजपला जात बेलापूरची उमेदवारी विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना मिळाली, तर ऐरोलीतून संदीप नाईक यांना. मात्र गणेश नाईक यांना डावलल्याने त्यांच्या समर्थकांत मोठी अस्वस्थता होती. बुधवारी कुटुंबात समझोता होत ऐरोलीतून संदीपऐवजी गणेश नाईक यांची उमेदवारी अंतिम करण्यात आली. आता नाईकांच्या उमेदवारीला शह देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे. त्यासाठी बेलापूर मतदारसंघासाठी गेले अनेक महिने मोर्चेबांधणी करणारे शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा हे अपक्ष अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती.

शिवसेना सोडून गेलेल्या नाईक, राणे, भुजबळ यांच्याविषयी शिवसैनिकांमध्ये आजही आकस कायम आहे. त्यामुळे नाईकांना धडा शिकविण्यासाठी ऐरोली मतदारसंघातून विजय नाहटा यांना अपक्ष उतरविण्याचा डाव आखला गेला आहे.

नाहटा यांनी बेलापूर मतदारसंघात मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे त्यांना तो मतदारसंघ हवा होता. पक्षाने तो युतीच्या वाटाघाटीत मागून घेतला नाही. भाजपचा मतदारसंघ असल्याने पक्षाने तो कायम ठेवण्यात यश मिळविले. या मतदारसंघात नाईक यांना उमेदवारी दिली गेली असती तरी नाहटा यांनी दंड थोपटले असते. त्याऐवजी आता नाहटांना ऐरोलीतून लढण्याचा सल्ला शिवसेनेच्या चाणक्य वर्तुळातून दिला जात आहे.

चार लाख मतदारसंख्या असलेल्या या  मतदारसंघात सेनेचे २७ नगरसेवक आहेत, तर पाच वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला ६८ हजार मते मिळालेली आहेत. तीन महिन्यांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाच्या उमेदवाराला ४५ हजारांचे मताधिक्य आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेच्या दृष्टीने अतिशय सुरक्षित मानला जात असल्याने नाहटा यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरवून नाईक यांना अस्मान दाखविण्याची व्यूहरचना आखण्यात आल्याचे समजते.

त्यामुळे राज्यात सर्वत्र युतीचा बोलबाला असला तरी नवी मुंबईत युती दिसून येत नाही. बेलापूर मतदारसंघातदेखील शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांनी उमेदवारी अर्ज भरून बंडाचे निशाण फडकविले आहे. ते हा अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे.

नाईकांचे आज शक्तिप्रदर्शन

गणेश नाईक गुरुवारी साडेबाराच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरणार असून हजारो कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन करणार आहेत. नाईक यांच्यासोबत शहरातील राष्ट्रवादीचे ४८ नगरसेवकांनी भाजपप्रवेश केलेला आहे. राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्त्यांसह नाईक यांच्यासोबत आता भाजप व शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते हा उमेदवारी अर्ज भरण्यास हजर राहणार असल्याने ही संख्या वाढणार आहे. नाईकांच्या उमेदवारीला शह देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे. त्यासाठी बेलापूर मतदारसंघासाठी गेले अनेक महिने मोर्चेबांधणी करणारे शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा हे अपक्ष म्हणून अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भात गुरुवारी रात्री उशिरा निर्णय होणार आहे.

नाईकांची अनुपस्थिती ठाकरेंना खटकली?

नाईकांनी मध्यंतरी बावखळेश्वर मंदिर पाडण्यात पक्षप्रमुख ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला होता. त्यात काही दिवसांपूर्वी माथाडी कामगारांच्या कार्यक्रमाला ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर असताना नाईकांची अनुपस्थिती ठाकरे यांना खटकली आहे.