पाच आजी-माजी नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर

राज्यात भाजप सरकार पुन्हा सत्तेवर न आल्याने विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठय़ा अपेक्षेने माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासोबत  भाजपवासी झालेल्या नगरसेवकांनी या पक्षाशी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवडय़ात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्यासह तीन नगरसेवकांनी शिवसेनेतील प्रवेशाचा मार्ग निश्चित केला. तर गुरुवारी बेलापूर विभागातील पाच आजी-माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत परतण्याची तयारी सुरू केली. त्यामुळे नाईक गडाला मोठे खिंडार पडले असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटली आहे.

विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेवर येईल अशी अटकळ सर्वानी बांधली होती, मात्र शिवसेनेने भाजपशी असलेली   नैसर्गिक युती तोडून परांपरागत विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली. तीन पक्षांचे मिळून सरकार राज्यात आले. त्यामुळे सत्तेची सारीच गणिते बिघडली. नाईक यांनी राष्ट्रवादीच्या ४९ नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र शिवसेना, राष्ट्रवादीच्या खेळीने भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले आहे.

या साऱ्या अनपेक्षित वातावरणात नगरसेवक स्वगृही परतत आहेत वा वेगळी वाट चोखाळत आहेत. यात भाजपमध्ये जाण्यास सुरुवातीपासूनच इच्छुक नसलेले तुर्भे येथील नाईक यांचे खंदे समर्थक, नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी नाईकांना पहिला झटका दिला आहे. कुलकर्णी हे यापूर्वी शिवसेनेचे शाखाप्रमुख होते. नाईकांबरोबर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये २० वर्षे काढली. कुलकर्णी यांच्यासोबत त्यांची नगरसेविका पत्नी राधा कुलकर्णी, सहकारी नगरसेविका संगीता वास्के आणि मुद्रिका गवळी यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतल्यासारखा आहे.

त्यानंतर आता तुर्भे गावातील माजी स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील यांच्यासोबत नेरुळ येथील माजी नगरसेवक संदीप सुतार आणि त्यांची नगरसेविका पत्नी सलुजा सुतार, भावजय शशिकला पाटील, भाऊ माजी नगरसेवक विवेक पाटील, वाशीतील माजी नगरसेवक राजू शिंदे हे पाच आजी-माजी नगरसेवक राष्ट्रवादीत पुन्हा परतणार आहेत. त्यांनी गुरुवारी पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांनी भाजपमधील अनेक नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी जाळे टाकलेले आहे. कुलकर्णी यांच्याशीही त्यांनी संपर्क साधला होता, पण कुलकर्णी यांनी शिवसेनेला पसंती दिलेली आहे. प्रभागातील मतदारांचा कौल आणि सत्तेची फळे चाखता येईल अशा पक्षांना हे नगरसेवक पसंती देत आहे. कोपरखैरणे व घणसोली भागात माथाडी मतदार मोठय़ा प्रमाणात आहेत. त्यामुळे या भागातील दोन नगरसेवक राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्या शब्दाला मान देणार आहेत. नवी मुंबईच्या उत्तर भागातील तीन प्रभावी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे येत्या काळात भाजपमधून १४ नगरसेवक भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत.

प्रभाग आरक्षण हरकतींवर आज सुनावणी

नवी मुंबई : नवी मुंबई पालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर घेण्यात आलेल्या ५२४ हरकतींवर आज पालिकेच्या ज्ञानकेंद्रात सुनावणी होणार आहे. प्रभाग सोडतीवर हरकती घेण्याचा कालावधी ३ ते १० फेब्रुवारीपर्यंत होता. या कालावधीत पालिकेकडे ५२४ हरकती दाखल झाल्या आहेत. अनेकांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित झालेत तर अनेकांचे प्रभाग अनुसूचित जाती,अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे राजकीय आखाडय़ातील अनेक मातबरांना आरक्षणाचा फटका बसला आहे. प्रभाग आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानुसार हरकती घेतलेल्यांना निश्चित वेळ ठरवून देण्यात आला आहे. त्यामुळे हरकत घेतलेल्यांनी निर्धारित वेळेच्या अगोदर १५ मिनिटे उपस्थित राहायचे आहे. एका दिवसात याच सर्व हरकतींवर सुनावणी होणार आहे. विष्णुदास भावे येथे आरक्षण सोडत व प्रभागांच्या रचनेबाबत अनेकांनी शंका उपस्थित केल्या होत्या. परंतु नियमानुसार हरकतींवर सुनावणीत निर्णय दिला जाईल असे सांगण्यात आले होते.

नाईक समर्थक आक्रमक

एका प्रभागापुरती ओळख असलेले नगरसेवक नाईकांना सध्या सोडून जात आहेत. त्यामुळे नाईक सर्मथकांनी समाजमाध्यमांवर एक मोहीम सुरू केली आहे. नाईक सर्मथकांच्या दृष्टीने ‘गद्दार’ असलेल्या या नगरसेवकांना येत्या निवडणुकीत धडा शिकविण्याची तयारी केली जात आहे.

नाईक यांना सत्तेची आशा

भाजप पर्यायी नाईक यांना रामराम ठोकणाऱ्या नगरसेवकांची मनधरणी करण्याचा कोणताही प्रयत्न नाईक यांच्याकडून केला जात नाही. जाणाऱ्यांना थांबवू शकत नाही, अशी भूमिका घेत नाईक यांनी किती जण पक्ष सोडून जात आहेत, त्याचे सध्या अवलोकन करीत आहेत. या सत्रातही आपण पालिकेत पुन्हा सत्ता आणणार असा ठाम विश्वास नाईक व्यक्त केला आहे.